मिरा रोडमधील आर्चिड बारवर पोलिसांचा छापा file photo
ठाणे

Orchid Bar police raid : मिरा रोडमधील आर्चिड बारवर पोलिसांचा छापा

गुप्त तळघरातून 3 अल्पवयीन मुलींसह 16 जणींची सुटका; पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : मिरा रोड रेल्वे स्थानक परिसरातील आर्चिड ऑर्केस्ट्रा बारवर (हॉटेल ब्लॅक मॅजिक) पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठा छापा टाकून अनैतिक व्यापाराचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी जीवघेण्या गुप्त तळघरातून 3 अल्पवयीन मुलींसह 9 जणींची सुटका केली, तर स्टेजवर 7 तरुणी आढळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी मॅनेजर, कॅशियरसह 13 जणांना अटक केली असून मालक व चालक फरार आहेत.

नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांती शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या आर्चिड बारमध्ये मानवी तस्करी आणि अल्पवयीन मुलींकडून अश्लील कृत्य करून घेतले जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस उपआयुक्त राहुल चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीनुसार, 9 एप्रिल रोजी रात्री 11:45 च्या सुमारास पोलिसांनी या बारला वेढा घातला. पोलिसांनी बारकाईने झडती घेतली असता, त्यांना एका भिंतीमागे अत्यंत गोपनीयरीत्या तयार केलेले कॅव्हिटी रूम (गुप्त तळघर) सापडले.

पोलिसांनी जेव्हा हे तळघर तोडले, तेव्हा आतील दृश्य पाहून अधिकारीही थक्क झाले. हवा, पाणी आणि प्रकाशाची कोणतीही व्यवस्था नसलेल्या एका अरुंद आणि जीवघेण्या खोलीत 6 महिला सिंगर आणि 3 अल्पवयीन मुलींना कोंडून ठेवण्यात आले होते. या मुलींचा गुदमरून मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असूनही केवळ पोलिसांपासून लपवण्यासाठी त्यांना तिथे डांबले होते.

तपासात असे समोर आले की, बारचे मालक आणि चालकांच्या सांगण्यावरून मॅनेजर व कॅशियर हे स्वतःच्या फायद्यासाठी या तरुणींना तोकडे कपडे परिधान करण्यास आणि ग्राहकांसमोर अश्लील अंगविक्षेप करण्यास भाग पाडत होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या मुलींना स्टेजवरून खाली उतरवून अश्लील कृत्ये करण्यास प्रोत्साहन दिले जात होते.

याप्रकरणी पोलिसांनी बारचे 2 मॅनेजर, 1 कॅशियर आणि 10 वेटर्स अशा एकूण 13 जणांना ताब्यात घेतले आहे. फरार मालक आणि चालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे विविध कलमासह कलम पॉक्सो कायदा, बालन्याय अधिनियम, महाराष्ट्र हॉटेल व मद्यपान कक्ष (अश्लील नृत्यावर प्रतिबंध) अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या 16 मुलींची रवानगी सरकारी आश्रयगृहात करण्यात आली आहे. या मुलींना कोणत्या आमिषाने येथे आणले होते आणि यामागे मोठे रॅकेट आहे का? याचा तपास पोलीस उपआयुक्त राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मिरा रोड पोलीस करत आहेत.

SCROLL FOR NEXT