मिरा रोड : मिरा रोड पोलीस ठाणे हद्दीतील ऐश्वर्या ऑर्केस्ट्रा बार वर गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-1, काशिमीरा यांनी कारवाई केली आहे. मिरा रोड पोलीस ठाणे हद्दीतील ऐश्वर्या ऑर्केस्ट्रा बार अँड रेस्टॉरंटमध्ये नियम डावलून गाण्याच्या बहाण्याने महिलांना अश्लिल नृत्य करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती गुन्हे प्रकटिकरण शाखा, कक्ष-1, काशिमीरा यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री त्या बार वर छापा टाकला असता त्या ठिकाणी 7 मुली या हिंदी गाण्यांवर नृत्य व अश्लिल नृत्य करताना आढळून आल्या. तसेच, काही मुली या बारमधील मेकअप रूमच्या शेजारील बोळामधून बाहेर पळून जात असल्याचे समजल्याने पाहणी केली असता 3 मुली या पळून जाताना मिळून आल्या. कारवाई वेळी, बारमध्ये एकूण 30 ग्राहक आढळून आले.
ऐश्वर्या ऑर्केस्ट्रा बार अँड रेस्टॉरंटचे चालक निकुंज रात्रा, मालक, मॅनेजर, वेटर्स यांनी आपसांत संगनमत करून बारमधील मुलींना नृत्य व अश्लिल नृत्य करण्यास बंदी असताना नृत्य करण्यास भाग पाडून प्रोत्साहित केले तसेच, नियमापेक्षा जास्त मुली ठेवून कायदेशीर आदेशाचा भंग केला. याप्रकरणी 10 आरोपी विरूध्द भारतीय न्याय संहिता कलामासह महाराष्ट्र हॉटेल, उपगृहे आणि मद्यपान कक्ष (बाररुम) यामधील नृत्य व अश्लिल नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलेंच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियमाच्या विविध कलमा अंतर्गत मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.