मिरा रोड : मिरा रोड येथील नयानगर परिसरात नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका 20 वर्षीय तरुणाने आपल्याच सावत्र बहिणीवर वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नयानगर पोलिसांनी पीडितेचा सावत्र भाऊ आणि तिला धमकी देणाऱ्या सावत्र वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2023 पासून जानेवारी 2025 या कालावधीत नयानगरमधील एका इमारतीत हा संतापजनक प्रकार घडत होता. आरोपी 20 वर्षाचा सावत्र भाऊ याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार तिच्यावर अत्याचार केला. याबाबत घरात कोणाला काही सांगितले, तर तुला जीवे मारून टाकेन आणि घरखर्चाला पैसे देणार नाही, अशी धमकी देऊन तो तिला गप्प बसवत होता.
पीडितेने हा सर्व प्रकार धाडस करून आपल्या आईला सांगितला. जेव्हा तिच्या आईने याबद्दल सावत्र वडील यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा त्यांनी मदतीऐवजी पीडितेला आणि तिच्या आईलाच धमकावले. जर हा प्रकार कोणाला सांगितला, तर तुम्हा दोघींना चाकूने जीवे मारून टाकेन, अशी धमकी वडिलांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सततच्या छळाला कंटाळून अखेर पीडितेने पोलीस ठाण्यात जाऊन 26 जानेवारी रोजी या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि पठाण हे करत आहेत. नयानगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, दोन्ही आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.