Thane Crime pudhari photo
ठाणे

Thane Crime : अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तिघांना अटक

मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : मिरारोड परिसरात व्यावसायिक प्रमाणात मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना मिरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्ष-१ ने सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी अंमली पदार्थांसह एकूण ४ लाख १६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुस्तफा नासिर माकड (वय २५, रा. आदित्य दर्शन बिल्डिंग, हैदरी चौक, मिरारोड), रजा अब्बास जाफरी (वय २७, रा. कांकर्ड विंग, छेडा कॉम्प्लेक्स, नयानगर, मिरारोड) आणि अरबाज सिराज खान (वय २९, रा. पनवेलकर भूमी सोसायटी, खरवई, बदलापूर पूर्व) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मिरा-भाईंदर रोडवर काशिमीरा दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील सोना पॅलेस बार अँड रेस्टॉरंट जवळील दिव्यांग स्टॉलच्या बाजूच्या फुटपाथवर अंमली पदार्थ विरोधी कक्ष-१ च्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी आरोपी मुस्तफा माकड याच्या ताब्यातून २ लाख २० हजार ८०० रुपये किमतीचे ७३.४ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. तर दुसरा आरोपी रजा जाफरी याच्याकडून ४५ हजार ६०० रुपये किमतीचे १५.२ ग्रॅम मेफेड्रॉन हस्तगत करण्यात आले.

तिसरा आरोपी अरबाज खान हा वरील दोन्ही आरोपींसोबत अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने आला होता. या कारवाईत अंमली पदार्थांसह एकूण ४ लाख १६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT