Mira Road Cheating Case Pudhari
ठाणे

Mira Road Cheating Case: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार! 8 लाख उकळून केलं दुसरं लग्न

याप्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड: लग्नाचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय तरुणीवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची आणि विविध कारणांसाठी तिच्याकडून तब्बल 8 लाख 8 हजार रुपये उकळून तिची फसवणूक करत दुसऱ्याच मुलीशी लग्न केल्याची घटना मिरा रोड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरा रोड येथील गोकुळ व्हिलेज परिसरात राहणाऱ्या 28 वर्षीय पीडित तरुणीची ओळख आरोपी हितेश जयसिंग दामी (32) याच्याशी झाली होती. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्याने पीडितेच्या घरी जाऊन तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

आरोपीने केवळ शारीरिक शोषणच केले नाही, तर लग्नाचे वचन दिल्याने पीडितेचा विश्वासार्हता फायदा घेत तिच्याकडून मोठी रक्कम उकळली. यामध्ये नवीन मोटारसायकलचे डाउन पेमेंट करण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि ऑफिसच्या फर्निचरसाठी तसेच प्लायवुड खरेदी करणे, घराचे भाडे आणि मोटारसायकलचे हप्ते भरण्यासाठी व कॅमेरे खरेदी करणे अशा वेगवेगळ्या कारणांसाठी त्याने 5 लाख रुपये रोख आणि 3 लाख 8 हजार रुपये ऑनलाइन असे एकूण 8,08,000 रुपये पीडितेकडून घेतले.

पीडितेने दिलेले पैसे परत न करता आणि दिलेले लग्नाचे वचन मोडून आरोपी हितेश दामी याने दुसऱ्या मुलीशी विवाह केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने मिरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुनम जांभळे या करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT