Cobra Snake Venom Smuggling Pudhari
ठाणे

Cobra Snake Venom Smuggling: सापाच्या विषातून कोट्यवधींचा धंदा; तिघे तस्कर जाळ्यात

काशीगावात ५ कोटी २१ लाखांचा मुद्देमाल जप्त; तस्करीच्या जाळ्याचा तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड: कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीचा काळा धंदा, कोब्रा सापाचे विष आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची विक्री करण्याचा संशयास्पद व्यवहार! काशीगाव परिसरात सुरू असलेल्या सर्पविष तस्करीच्या धक्कादायक प्रकाराचा पोलिसांनी आणि वनविभागाने संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे.

सापाच्या विषाची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून कोब्रा जातीच्या सापाचे विष, मोटारसायकल आणि मोबाईल फोन असा तब्बल ५ कोटी २१ लाख ८० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे वन्यजीवांच्या अवैध तस्करीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय बळावला आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुरुवारी (२९ ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काशीगाव येथील दोडिया पेट्रोलपंपाजवळ सर्पविषाची विक्री करण्यासाठी काही संशयित व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संयुक्त सापळा रचला. संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवत पथकाने योग्य संधी साधून तिघांना ताब्यात घेतले.

त्यांच्या अंगझडतीदरम्यान काचेच्या बाटल्यांमध्ये भरलेले कोब्रा जातीच्या सापाचे संशयित विष आढळून आले. अचानक झालेल्या या कारवाईने सर्पविष विक्रीच्या व्यवहारासाठी आलेल्या आरोपींचे धाबे दणाणले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे फैजान अब्दुल अजीज (वय ३०, रा. तळोजा, नवी मुंबई), अब्दुल करीम रशीद अहमद शेख (वय ५१, रा. चिता कॅम्प, मानखुर्द) आणि मोहम्मद दानीश फयीम खान (वय २३, रा. चिता कॅम्प, मानखुर्द) अशी आहेत. आरोपींकडे आढळलेल्या काचेच्या बाटल्यांसह सर्पविषाचे एकूण वजन ३९३ मिलीग्रॅम, तर निव्वळ विषाचे वजन २५० मिलीग्रॅम नोंदवण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मूल्यानुसार या विषाची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईत सर्पविषाबरोबरच ८० हजार रुपये किमतीची मोटारसायकल आणि तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. सर्पविषाच्या मूल्यांकनासह जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत ५ कोटी २१ लाख ८० हजार १०० रुपये असल्याची माहिती आहे.

कोट्यवधींच्या विषाचा मूळ स्रोत कोण?

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एवढ्या मोठ्या बाजारमूल्याचे सर्पविष आरोपींपर्यंत पोहोचले कुठून? कोब्रा सापाचे विष मिळवण्यासाठी कोणत्या भागातून साप पकडण्यात आले? त्यासाठी स्वतंत्र शिकारींचे जाळे कार्यरत आहे का? या तिघांकडे विषाचा पुरवठा करणारा मुख्य सूत्रधार कोण आणि हे विष नेमके कोणत्या ग्राहकाला विकले जाणार होते? या व्यवहारामागे आंतरराज्यीय अथवा आंतरराष्ट्रीय तस्करीचे जाळे आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरोपींचे मोबाईल फोन, त्यांचे संपर्क आणि आर्थिक व्यवहार तपासल्यानंतर या तस्करीच्या साखळीतील आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

आरोपींना सात दिवसांची कोठडी

या प्रकरणी वनपरिक्षेत्र कार्यालय, मुंबई येथील वनपाल युवराज जोशी यांच्या तक्रारीवरून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ (सुधारित २०२२) मधील विविध कलमांसह भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली काशीगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. न्यायालयाने तिन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने आता या तपासात कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT