Crime News pudhari photo
ठाणे

Mira Road Car Attack: मैत्रिणीला भेटायला गेलेल्या तरुणावर कार घालण्याचा प्रयत्न; मिरा रोडमध्ये थरार

वादानंतर तरुणाने मित्रांना बोलावले; कार अडवण्याचा प्रयत्न होताच चालकाने बुलेटला धडक देत तरुणालाही उडवले

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड: मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तिच्यासोबत वाद झाला. त्यानंतर मैत्रिणीने आणि तिच्या वडिलांनी त्याला मारहाण केली. या घटनेनंतर तरुणाने मित्रांना घटनास्थळी बोलावले. काही वेळाने मैत्रीण कारमधून निघून जात असताना तिची कार अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी कारचालकाने भरधाव वेगात कार पुढे नेत प्रथम समोरून येणाऱ्या बुलेटला धडक दिली आणि त्यानंतर संबंधित तरुणालाही जोरदार धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मिरा रोडमध्ये घडली. या घटनेत तरुण जखमी झाला असून, याप्रकरणी कारचालकासह तिघांविरुद्ध मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदर येथील रहिवासी संजय सुरेश गिरी (३४) हे २ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास मिरा रोड येथील वासुदेव कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या त्यांच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेले होते. तेथे दोघांमध्ये वाद झाला. या वादातून भावना सिंग आणि तिचे वडील विश्राम सिंग यांनी संजय गिरी यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मारहाणीनंतर गिरी यांनी आपल्या मित्रांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. दरम्यान, भावना सिंग ही पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून तेथून निघाली. पहाटे सव्वापाचच्या सुमारास युनिक गार्डनसमोरील कॉर्नरजवळ संजय गिरी चालत जात होते. त्यांनी आपल्या मित्राला संबंधित कार थांबवण्यास सांगितले.

मात्र, कारचालक राहुल राजेंद्र सिंग याने कार न थांबवता भरधाव वेगाने पुढे नेल्याचा आरोप आहे. कार पळवून नेत असताना राहुल सिंग याने प्रथम समोरून येणाऱ्या एका बुलेटला जोरदार धडक दिली. या धडकेत बुलेटस्वार आणि त्याच्या मागे बसलेली महिला रस्त्यावर कोसळली. त्यानंतर कारने संजय गिरी यांनाही समोरून जोरदार धडक दिली.

धडकेनंतर गिरी काही अंतर फरफटत गेले. एवढेच नव्हे तर कारचे डाव्या बाजूचे चाक त्यांच्या पोटावरून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या भीषण धडकेत गिरी यांच्या दोन्ही पायांना आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली असून, डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.

घटनेनंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी संजय गिरी यांच्या तक्रारीवरून मिरा रोड पोलिसांनी राहुल राजेंद्र सिंग, भावना सिंग आणि विश्राम सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT