मिरा रोड: काशिमीरा येथील बहुचर्चित शामू लहरी गौड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि गेल्या 9 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत सुपारी किलरला गुन्हे प्रकटीकरण शाखा (कक्ष 1) च्या पथकाने अटक केली आहे. राजेश रविदास (34) असे या आरोपीचे नाव असून, त्याला झारखंडमधील हजारीबाग येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील मिरा गाव येथे 6 एप्रिल 2017 रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. मयत शामू लहरी गौड (50) यांच्या घराचा दरवाजा अनोळखी इसमांनी ठोठावला. त्यांनी दरवाजा उघडताच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्या छातीवर गावठी कट्ट्यातून गोळी झाडून त्यांची निर्घण हत्या केली होती.
याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली होती. मुख्य आरोपी सुनीलकुमार रजक याने 2015 मध्ये एका जुन्या खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी मयत शामू गौड यांच्याकडून 5 लाख रुपये उसने घेतले होते.
शामू हे वारंवार या पैशांची मागणी करत होते. याच पैशांच्या वादातून सुनीलकुमारने राजेश रविदास याला 2 लाख रुपयांची सुपारी देऊन शामू यांचा काटा काढण्याचे ठरवले. राजेशने झारखंडवरून आपल्या 3 साथीदारांसह मिरारोड येथे येऊन रेकी केली आणि ही हत्या केली.
या गुन्ह्यातील दोन आरोपींना मार्च 2026 मध्ये न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, मात्र गोळीबार करणारा मुख्य शूटर राजेश रविदास फरार होता. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 1 चे पथक तांत्रिक तपासाद्वारे त्याच्या मागावर होते. तो झारखंडमधील हजारीबाग येथे नाव बदलून राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचला आणि त्याला बेड्या ठोकल्या.
अटक करण्यात आलेला राजेश रविदास हा सराईत गुन्हेगार असून, त्याने यापूर्वी झारखंडमधील तलैय्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1.5 लाख रुपयांची सुपारी घेऊन एका व्यक्तीचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.
हजारीबाग न्यायालयाने त्याला ट्रान्झिट रिमांड मंजूर केल्यानंतर आता त्याला पुढील तपासासाठी काशिमीरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक सुशिलकुमार शिंदे, स.पो.नि. सचिन सानप, योगेश काळे, पोउनि उमेश भागवत आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.