मिरा-भाईंदर महापालिका 
ठाणे

Maharashtra Politics : गतवेळच्या निवडणुकीत सेनेने रंगविलेले सत्तेचे स्वप्न भाजपने हिरावून घेतले

यंदाच्या निवडणुकीत वाढलेल्या मतदारांच्या संख्येवर सेनेची भाजप नेत्यांकडे युतीसाठी घोडदौड

पुढारी वृत्तसेवा

राजू काळे

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेची ऑगस्ट 2017 मधील सार्वत्रिक निवडणुक प्रामुख्याने सेना-भाजपाने प्रतिष्ठेची केली होती. यावेळी सत्ता सेनेचीच येणार, असे भाकीत करीत सेनेच्या नेत्यांनी सत्तेची स्वप्ने रंगविली होती. मात्र भाजपाने निर्विवाद बहुमत मिळवित सेनेच्या सत्तेचे स्वप्न हिरावून घेतले. यंदाच्या निवडणुकीत मात्र सेनेने भाजपसोबत युती करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घौडदौड सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावेळी सेनेची सत्ता आली नसली तरी सेनेच्या जागा 7 ने वाढल्या तर भाजपाने धर्माच्या आधारावरच एकहाती सत्ता काबीज केल्याचा आरोप त्यावेळी सेनेकडून करण्यात आला. सत्तेचा दुसरा दावेदार ठरलेल्या काँग्रेस पक्षाला अवघ्या 13 जागांवरच समाधान मानावे लागले.

सेना-भाजपाने मागील निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावून प्रसंगी साम, दाम, दंडाचा वापर करण्याची तयारी केली होती. सुरुवातीला पैकीच्या पैकी जागा मिळविण्याचा भाजपा आ. नरेंद्र मेहता यांचा दावा केवळ पोकळ वल्गना ठरू लागल्याने निवडणुकीची धुरा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतली. मंत्री, आमदार, खासदार उमेदवारांच्या प्रचारासाठी दावणीला बांधले गेले. मीरारोड येथील प्रभाग 16, 17 व 18 आणि प्रभाग 2, 3, 4, 5, 10 व 11 मधील विजयाच्या वाटा अडचणीच्या ठरू लागताच या प्रभागांतर्गत अनुक्रमे मीरारोडच्या सिल्वर पार्क व भाईंदर पुर्वेच्या जेसलपार्क येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभा घेण्यात आल्या. याला प्रत्युत्तर देण्यासाठी सेनेने भाईंदर पूर्वेच्या नवघर मैदानात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकमेव प्रचार सभा घेतली. (यावेळी सेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होती.) सेनेचे पारडे जड होत असल्याचे लक्षात येताच भाजपने नेहमीप्रमाणे धार्मिक कार्ड प्रचारात आणले. थेट धर्मगुरुंमार्फत गुजराती, मारवाडी समाजातील लोकांना भाजपला एक गठ्ठा मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात आली. धर्मगुरूंचे भाजपाई आवाहन घरोघरी पोहोचले आणि भाजपाच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. शहरात गुजराती, मारवाडी समाज मोठ्याप्रमाणात असल्याने या समाजातील मतदारांची वोट बँक निर्णायक असल्याचे मानले जाते. तर दुसरी वोट बँक म्हणून उत्तर भारतीयांना पाहिले जाते. यामुळे सेना-भाजपने उत्तरभारतीयांना आपलेसे करून आपापली वोट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपच्या धार्मिक कार्डाचा डाव यशस्वी झाल्याने भाजपाला गतवेळच्या 32 जागांमध्ये 29 जागांची वाढ मिळून भाजपला एकूण 61 जागा मिळाल्या. तर सेनेने किमान 55 पर्यंतच्या जागा मिळण्याचा कौल फोल ठरून सेनेला 21 जागांवर समाधान मानावे लागले. यावेळी सेनेने 2012 मधील निवडणुकीत जिंकलेल्या 14 जागांमध्ये 7 ने वाढ करून आपल्याला जनतेने बहुमत दिले नसले तरी अनपेक्षित यश दिल्याची सारवासारव करावी लागली. या निवडणुकीत सेनेने काँग्रेसचे सहकार्य मिळविले होते. त्यामुळे सेनेच्या त्यावेळच्या पक्षप्रमुखांनी आपल्या प्रचार सभेत काँग्रेसच्या मेट्रो कार्याला दिलेले प्रमाणपत्र मतदारांनी झिडकारून लावले होते. तर काँग्रेसचे त्यावेळचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी एकला चलोच्या भूमिकेत काँग्रेसच बहुमतात येणार असल्याचा दावा केला. यानंतरही काँग्रेसला आपले बालेकिल्ले राखून इतर ठिकाणच्या पराभवाला सामोरे जावे लागले.

यंदाची निवडणूक मात्र भाजपने एकला चलोच्या माध्यमातूनच लढविण्याचा पावित्रा घेतला असून त्यात वाटेकरी होण्यासाठी सेनेने युतीचा प्रस्ताव भाजपच्या नेत्यांपुढे मांडला आहे. त्याला स्थानिक पातळीवरील भाजपने विरोध दर्शविला असून पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्याप्रमाणेच निवडणूक लढविण्याचा कांगावा देखील केला आहे. युती करण्यासाठी सेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आग्रही असून त्यांनी गेल्या निवडणुकीत सेनेच्या वाढलेल्या जागा तर यंदा वाढलेल्या मतदारांचा आकडा हाताशी धरीत दोन्ही पक्षांसाठी फिफ्टी-फिफ्टी जागांचा फॉर्मुला त्यांनी भाजप नेत्यांसमोर मांडला आहे.

दोन्ही पक्षांच्या युतीवर तूर्तास टांगती तलवार

भाजपचे स्थानिक नेते आ. नरेंद्र मेहता यांनी युती ऐवजी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा मनसुबा व्यक्त केला आहे. त्यासाठी ते वरिष्ठांचे मन वळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. तर दोन्ही पक्षांच्या युतीवर तूर्तास टांगती तलवार असल्याचे दिसून आले आहे. तर युतीसाठी आग्रही असलेले परिवहन मंत्री जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलून युतीसाठी नव्याने प्रस्ताव पुढे करतील का, हे पाहावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT