भाईंदर : कर्नाटकचे आयटी शहर बंगळूरू, बिहार आणि चंदिगड पाठोपाठ महाराष्ट्रातही ‘झोंबी’ हे ड्रग्ज दाखल झाले की काय, असा भयप्रश्न व्हायरल झालेल्या दोन व्हिडिओंमुळे निर्माण झाला आहे. मिरा-भाईंदरमध्ये या झोंबी ड्रग्जच्या प्रभावाखाली विचित्र हालचाली करत किंवा स्तब्ध अवस्थेत एकाच ठिकाणी तासनतास उभे असलेल्या दोन तरुणांचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आणि सारेच चिंतेत पडले.
मुंबईत नेस्को सेंटरच्या कॉन्सर्टमध्ये गेल्याच शनिवार एमडी ड्रग्जच्या गोळ्या घेतल्याने एक तरुणी व एक तरुण असे दोघांचे बळी गेले. त्याचा तपास सुरू असतानाच झोंबीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर बुधवारी फिरू लागले.
यातील एक व्हीडिओ भाईंदर पूर्वेकडील 90 फूट रोडवरील असून दुसरा व्हीडिओ भाईंदर पश्चिमेकडील बाळासाहेब ठाकरे मैदानाच्या बाजूचा आहे. झोंबी ड्रग्ज घेतल्यास ती व्यक्ती एकाच ठिकाणी स्तब्ध होते. झोंबी घेतलेले काहीजण रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात विचित्र अवस्थेत उभे आढळल्याचे बोलले जाते. व्हायरल झालेल्या व्हीडिओ क्लिपमध्ये दिसणारे तरुण हे स्वतःवरचा ताबा गमावून एकाच ठिकाणी स्तब्ध होतात.
हे ड्रग्ज घेतलेल्या व्यक्तींना आसपासच्या वातावरणाची वा लोकांची कोणतीही जाणीव होत नाही. ती व्यक्ती झोंबीची नशा संपेपर्यंत एकाच जागी स्तब्ध होतात. मात्र अनेकदा हिंसक होऊन स्वत:ला किंवा इतरांनाही इजा करतात. त्यामुळे बुधवारी झोंबी होऊन जागीच स्तब्ध झालेल्या तरुणांचे व्हिडिओ पहाताच मिरा-भाईंदर परिसरात दहशत पसरली.