भाईंदर : राजू काळे
मिरा-भाईंदर शहराला वायफाय सिटी करण्याच्या अनुषंगाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन खाजगी कंपन्यांना अंदाजपत्रक व प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचे सादरीकरण नुकतेच पालिका मुख्यालयात करण्यात आले. त्यावेळी परिवहन मंत्र्यांसह आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्यासह पालिकेतील इतर अधिकारी तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या डिजिटल युगात इंटरनेटचा वापर मोठ्याप्रमाणात होत आहे. मात्र त्यासाठी वायफाय कनेक्शन अत्यावश्यक ठरते. त्यातही वायफायचा स्पीड किती आहे, त्यावर इंटरनेटची सुविधा फायदेशीर ठरते. या वायफाय सुविधेचा फायदा शहरातील नागरीकांना, प्रामुख्याने विद्यार्थ्यांना मोफत मिळावा, यासाठी वायफाय सिटी संकल्पना राबविण्यात येणार आहे.
या संकल्पनेनुसार उपलब्ध करून देण्यात येणारे वायफाय मोफत असावे, या दृष्टीने त्याचे सादरीकरण नुकतेच पालिका मुखयालयात करण्यात आले. हे सादरीकरण मेसर्स सेरेलिक्स व मेसर्स रेलटेल कॉर्पोरेशन या दोन खाजगी कंपन्यांकडून करण्यात आले. त्यावेळी मोफत वायफायची सेवा पालिकेच्या खर्चातून न देता पुरवठादार कंपन्यांना जाहिरातीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच त्या उत्पन्नाचा काही भाग पालिकेला देण्यात यावा जेणेकरून पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल. मात्र त्याचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांकडून शुल्क आकारण्यात यावे, असा विचार मांडण्यात आला.
तर सादरीकरण करणाऱ्या कंपन्यांनी हि सेवा पालिकेच्या खर्चातून उपलब्ध करून देण्यावर भर देत ती मोफत ऐवजी सशुल्क पुरविण्यात यावी, असे नमूद केले. त्यावर हि सेवा मोफत किंवा सशुल्क तसेच पुरवठादाराकडून पालिकेला रॉयल्टी देण्याच्या माध्यमातून अथवा पालिकेच्या खर्चातून सुरु करण्याचा प्रस्ताव तसेच त्याचे वेगवेगळे अंदाजपत्रक सादर करून ते पालिकेला सादर करण्याचे निर्देश सरनाईक यांनी सादरीकरण करणाऱ्या कंपन्यांना दिले.
नागरिकांना वायफायची सुविधा मोफत
हि सेवा मोफत उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा शहरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे शहरातील सामान्य नागरीकांना वायफायची सुविधा मोफत तर व्यावसायिक वापर करणाऱ्यांना माफक शुल्क आकारून उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. कारण सध्याच्या स्पर्धात्मक युगात वायफाय सिटी संकल्पनेतील वायफायचे जास्त शुल्क आकारल्यास हि संकल्पना अपयशी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.