Pigeon Feeding Ban Pudhari
ठाणे

Pigeon Feeding Ban: मिरा-भाईंदरमध्ये कबुतरांना दाणे टाकल्यास ५ हजारांपर्यंत दंड; महापालिकेचा इशारा

शहरातील अनेक पक्षी (विशेषतः कबुतर) प्रेमी ठिकठिकाणी कबुतरांना दाणे टाकतात.

पुढारी वृत्तसेवा

राजू काळे

भाईंदर: कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी दाणे टाकणाऱ्यांवर ५०० ते ५ हजारपर्यंत दंडात्मक कारवाई करण्‍यात येणार आहे. कबुतरांना दाणे टाकल्यामुळे होणारी घाण, आरोग्याला होणारे धोके व पर्यावरणाचा असमतोल लक्षात घेत मिरा-भाईंदर महापालिकेकडून ठिकठिकाणी दंडात्मक कारवाईचा इशारा देणारे फलक लावले आहेत.

त्याचे उल्लंघन केल्यास पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा फलकाद्वारे देण्यात आला आहे. शहरातील अनेक पक्षी (विशेषतः कबुतर) प्रेमी ठिकठिकाणी कबुतरांना दाणे टाकतात.

काही महिन्यांपूर्वी कबुतरांना दाणे टाकल्यानंतर त्या ठिकाणी होणारी घाण, कबुतरांच्या विष्ठामुळे श्वसनाचे विकार होत असल्याचे निदान करण्यात आल्याने कबुतरांना दाणे टाकण्यावरून वादंग उठले होते.

याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने २४ जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशात कबुतरांची विष्ठा व पिसांमुळे आरोग्याला होणारे संभाव्य धोके गांभीर्याने घेण्याचे स्पष्ट केले.

यावर राज्य शासनाने दादर येथील कबुतरखाना बंद करून इतर ठिकाणचे कबुतरखाने देखील बंद करण्याचे निर्देश प्रमुख शहरांच्या स्थानिक प्रशासनांना दिले. मात्र त्यावर ठोस कारवाई होत नसल्याने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकले जात आहेत.

त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासह कबुतरांची वाढती संख्या व कबुतरखान्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा उल्लेख स्थानिक जैवविविधता धोरण आणि कृती आराखड्यात करण्यात आला असताना त्याची ठोस अंमलबजावणी केली जात नसल्याचे समोर आले.

त्यावर सुधारणात्मक उपाय म्हणून कबुतरखाने बंद करण्याचा समावेश स्थानिक जैवविविधता धोरण आणि कृती आराखड्यात करण्यात आला आहे. कबुतरखान्यांचे सर्वेक्षण व कारवाईची मागणी शहरातील पर्यावरणवाद्यांनी मिरा-भाईंदर महापालिकेकडे केली होती.

त्यात शहरातील सर्व कबुतरखान्यांचे व त्यांना खाद्य देण्याच्या प्रमुख ठिकाणांचे सर्वेक्षण व नकाशांकन करण्यासह संवेदनशील क्षेत्रे, शाळा, रुग्णालये, आरोग्य केंद्रे व उद्यानांजवळ कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी घालण्याचे फलक प्रशासनाकडून ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आकारण्याचा इशारा फलकाद्वारे देण्यात आला आहे.

नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण आवश्‍यक...

कबुतरांमुळे मानवी आरोग्यावरील परिणामांची तसेच स्थानिक जैवविविधता धोरण व कृती आराखड्याच्या शिफारशींवरील कृती अहवाल प्रसिद्ध करण्याची मागणी देखील पर्यावरणवाद्यांकडून करण्यात आली आहे.

ही समस्या कोणत्याही धर्म किंवा भावनेशी निगडित नसून सार्वजनिक आरोग्य व पर्यावरणाच्या संतुलनाशी संबंधित असल्याने पक्षी प्रेमी असण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे महत्त्वाचे असल्याने कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर दांडात्मक कारवाईचे फलक पालिकेकडून ठिकठिकाणी लावण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT