भाईंदर : भाईंदर पश्चिमेकडील गगनचुंबी इमारतीमध्ये घर घेण्यासाठी गेलेल्या सिद्धेश राणे व रवींद्र खरात या मराठी भाषिकांना तेथील बिल्डरने मराठ्यांना फ्लॅट विकणार नसल्याचे सांगून केवळ गुजराती, मारवाड्यांनाच फ्लॅट विकण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे मिरा-भाईंदरमध्ये मराठी, अमराठी वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे निदर्शनास आले.
गेल्या काही वर्षांमध्ये शहरात अमराठी भाषिकांचा वाद सतत होताना दिसू लागला आहे. यामुळे एकेकाळी धर्मनिरपेक्ष असलेले मिरा-भाईंदर शहर प्रांत व भाषा वादामुळे चर्चेला येऊ लागले आहे. गेल्या गोपाळकाल्यापूर्वी एका मारवाडी समाजातील दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या कानशिलात लगावल्याचे प्रकरण चांगलेच तापले होते.
यावेळी शहरातील सर्व मराठी भाषिक एकवटून त्यांनी अमराठी भाषिकांपुढे आव्हान उभे केले होते. त्यावेळी शहरात तणावाचे वातावरण पसरले असतानाच यंदा पुन्हा घर घेण्याच्या कारणावरून मराठी, अमराठी वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. भाईंदर पश्चिमेकडील सालासर भवन परिसरात गगनचुंबी इमारतीत फ्लॅट घेण्यासाठी सिद्देश राणे व रवींद्र खरात या दोन व्यक्ती बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्या इमारतीतील बिल्डरच्या कायार्लयात गेले होते.
त्यावेळी बिल्डरच्या कर्मचाऱ्यांनी त्या दोघांना मराठी भाषिकांना फ्लॅट विकत नसल्याचे सांगून फ्लॅट केवळ गुजराती, मारवाड्यांनाच विकत असल्याचे स्पष्ट केले. कारण या इमारतीत फ्लॅट घेणाऱ्यांना मांसाहार करता येणार नसून त्यात केवळ शाकाहार करणाऱ्यांनाच फ्लॅट विकत असल्याचे सांगितले. बिल्डरने तसे आदेश त्यांनी दिल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्याची व्हीडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात मराठी, अमराठी वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.
हे शहर मूळ मराठी भाषिक असलेल्या आगरी, कोळी लोकांचे आहे. मात्र गैर मराठी भाषिकांची खोगीर भरती झाली आणि हे मराठी भाषिकांच्या डोईजड ठरू लागले आहेत. हा वाद पालिकेच्या तत्कालीन महासभेतही झाला होता. त्यात महासभेत दिले जाणारे जेवण शाकाहारीच असावे, असा अट्टाहास केला होता. आता हेच अमराठी भाषिक ठरविणार कोणी काय खायचे व कोणाला घरे विकायची. अशा अमराठी लोकप्रतिनिधींनी वेळीच सावध होऊन मराठी, अमराठी वाद टाळावा अन्यथा मराठी भाषिक त्यांना शहराबाहेर कधी हद्दपार करतील ते सांगता येत नाही.सिद्धेश राणे