भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी करण्यात येत असून त्यात काँग्रेसचे माजी आ. मुझफ्फर हुसैन यांच्या प्रचार सभेतील वादग्रस्त विधानाविरोधात भाजपने नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
या तक्रारीत मुझफ्फर यांनी मेरे कौम के लडके शेर है, एक बार जाओ बोलूंगा, तो तुम नजर मे भी नहीं आओगे, असे वादग्रस्त तसेच दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप भाजपने केला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास नयानगर येथे मुजफ्फर यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांनी संबंधित वादग्रस्त वक्तव्य केल्याची व्हीडिओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती.
त्याची गंभीर दखल घेत भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष रणवीर वाजपेयी यांनी नयानगर पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार अर्ज दाखल केला. त्यात वाजपेयी यांनी काँग्रेस नेते मुझफ्फर यांनी केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह असून त्याचा अर्थ कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा, समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणारा तसेच विशिष्ट समाज किंवा विचारसरणीतील नागरिकांना धमकाविण्याचे असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
मुझफ्फर यांनी केलेल्या वक्तव्यात विशेषतः हिंदू धर्मातील लोकांना घाबरविणे तसेच शहरात जातीय तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा हेतू असल्याचा दावा वाजपेयी यांनी दिलेल्या तक्रार अर्जात करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर मुझफ्फर यांचे वक्तव्य बेताल असून त्यांनी त्यातून हिंदू समाजाला घाबरविण्याचा केलेला प्रयत्न आक्षेपार्ह आहे. अशा पोकळ वक्तव्यांना किंवा धमक्यांना हिंदू समाज कधीही घाबरलेला नाही व घाबरणार नाही, असा दम भाजप आ. नरेंद्र मेहता यांनी दिला आहे.