Mira Bhayandar Bus Fare Hike Pudhari
ठाणे

Mira Bhayandar Bus Fare Hike: मिरा-भाईंदर मनपा परिवहनच्या प्रवासी भाड्यात वाढ; किमान २ तर कमाल १४ रुपये वाढ?

वातानुकूलित बसची कपात प्रस्तावित

पुढारी वृत्तसेवा

राजू काळे

भाईंदर: मिरा-भाईंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन विभागाने १६ ऑक्टोबर रोजी पार पडणाऱ्या महासभेत साधारण बसच्या प्रवासी भाड्यात किमान तर कमाल १४ रुपयांची वाढ प्रस्तावित केली आहे.

याउलट वातानुकूलित बसच्या प्रवासी भाड्यात किमान २ तर कमाल ४५ रुपयांची कपात करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जाणार आहे.

प्रस्तावित भाडेवाढ व कपातीला मंजुरी मिळाल्यास साधारण बसच्या प्रवाशांची संख्या रोडावण्याची तर वातानुकूलित बसच्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सध्या साधारण बसचे प्रवासी भाडे पहिल्या २ किमीसाठी ६ रुपये इतके असून ते नवी मुंबई, ठाणे व वसई-विरार परिवहन सेवेच्या तुलनेत १ ते ४ रुपयांनी कमी आहे. त्यामुळे परिवहन विभागाने या अंतरासाठी २ रुपयांची वाढ प्रस्तावित केली आहे.

वातानुकूलित बसचे भाडे पहिल्या २ किमीसाठी २० रुपये इतके असून ते नवी मुंबई, ठाणे व वसई-विरार परिवहन सेवेच्या तुलनेत ५० टक्क्यांनी जास्त असल्याने त्यात ५ रुपये कपात प्रस्तावित करण्यात आली आहे. मिरा भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा २००५ पासून सुरू करण्यात आली.

सद्यस्थितीत परिवहन विभागांतर्गत टाटा कंपनीच्या ५९ स्टॅन्डर्ड, १० मिडी व ५ वोल्वो एसी अशा एकूण ७४ बसेस इंधनावर चालविल्या जात आहेत. तर १५ स्टॅन्डर्ड, ३२ मिडी व १० एसी अशा एकूण ५७ इलेक्ट्रिक बसेस चालविल्या जात आहेत.

भविष्यात पीएम ई-बस सेवा अंतर्गत ६० स्टॅन्डर्ड एसी व ४० मिडी एसी अशा एकूण १०० एसी बसेस परिवहन विभागाला प्राप्त होणार आहेत. ७४ डिझेल बस व १५ व्या वित्त आयोगाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत अनुदानातून खरेदी केलेल्या ५७ ई-बसच्या परिचलनासाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट तत्वावर स्वतंत्र २ ऑपरेटर नियुक्त करण्यात आलेले आहेत.

जीसीसी तत्वावरील उपक्रमांतर्गत तिकिटापासून मिळणारे उत्पन्न पालिकेकडे जमा केले जाते. त्याकरिता स्वतंत्र तिकीट संकलन एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. बसचे परिचलन करणाऱ्या ठेकेदाराला तसेच तिकिट संकलन एजन्सीला पालिकेकडून प्रती किमी दराने देयक अदा केले जाते.

त्यामुळे तिकीट संकलनापासून मिळालेले उत्पन्न व बस ऑपरेटर, तिकिट संकलन एजन्सी, विभागाचे इतर प्रशासकीय खर्च यामध्ये येणारी तफावतीची रक्कम पालिकेकडून परिवहन उपक्रमाला हस्तांतरीत केली जाते.

बसेसच्या वाढत्या संख्येमुळे तफावतीची रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढून ती पालिकेकडून हस्तांतरीत करून घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पालिकेने २३ मार्च २०२३ च्या प्रशासकीय बैठकीत तिकीट दरवाढीचा ठराव मंजूर करून तो मान्यतेसाठी शासन यांच्याकडे पाठविण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT