Auto drivers Marathi test Pudhari
ठाणे

Auto drivers Marathi test : मिरा-भाईंदरला 3,443 पैकी 565 रिक्षाचालक मराठीत नापास

मिरा-भाईंदर उपप्रादेशिक कार्यालयाने मागील काही दिवसांपासून शहरातील रिक्षा चालकांच्या परमिटची तपासणी करीत त्यांना मराठी भाषा बोलता येते किंवा नाही त्यांची चाचपणी केली.

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : राजू काळे

मिरा-भाईंदर उपप्रादेशिक कार्यालयाने मागील काही दिवसांपासून शहरातील रिक्षा चालकांच्या परमिटची तपासणी करीत त्यांना मराठी भाषा बोलता येते किंवा नाही त्यांची चाचपणी केली असता एकूण 3 हजार 443 पैकी 565 रिक्षा चालकांना मराठी भाषा बोलता येत नसल्याचे स्पष्ट झाले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी परिवहन आयुक्तांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेंत ही आकडेवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी प्रसाद नलावडे यांनी दिली. उपप्रादेशिक कार्यालयाने मराठी भाषा बोलता येत नसलेल्या रिक्षा चालकांना बॅज, परमिट व लायसन्स कोणत्या आधारे दिले, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होऊ लागला आहे.

मिरा-भाईंदरमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे रिक्षांचे बॅज, परमिट व लायसन्स काढण्यात येत असल्याची चर्चा कधीपासून सुरु आहे. उपप्रादेशिक कार्यालयाने मात्र रिक्षा तपासणीत कोणत्याही रिक्षाचे बॅज, परमिट व लायसन्स बोगस कागदपत्रांद्वारे काढण्यात आल्याचे निदर्शनास आले नसल्याचा दावा केला.

रिक्षाचे बॅज, परमिट व लायसन्स काढण्यासाठी मराठी भाषा अनिवार्य तसेच राज्यातील 15 वर्षे वास्तव्याचा पुरावा, शाळेचा दाखला, जन्मदाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड व वीजबिल सादर करणे बंधनकारक आहे. असे असताना अनेक रिक्षाचालकांनी मिरा-भाईंदर महापालिकेतून मिळवलेले जन्मदाखले एकच नोंदणी क्रमांक नोंद करून बेकायदेशीररीत्या वास्तव्याचा दाखला मिळविण्यासाठी सादर केल्याचे समोर आले आहे.

वास्तव्याचे दाखले भाईंदर येथील अप्पर तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीने देण्यात आले. यावरून रिक्षा बॅज, परमिट व लायसन्स बोगस कागदपत्रांद्वारेच मिळविण्यात आल्याचे स्पष्ट होत असून याची सखोल चौकशी करून ते बॅज, परमिट व लायसन्स रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे.

4 मे रोजी परप्रांतीय चालकांचा मोर्चा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आता 15 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे. मात्र मराठी शिकण्याला विरोध करत येत्या 4 मे रोजी परप्रांतीय रिक्षा व टॅक्सी चालकांनी मोर्चा घोषित केला आहे. तत्पूर्वीच मिरा-भाईंदर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने राबविलेल्या रिक्षा तपासणी मोहिमेत एकूण 3 हजार 443 रिक्षांची तपासणी केली. त्यात 565 रिक्षा चालकांना मराठी भाषा येत नसल्याची कबुली उपप्रादेशिक कार्यालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मागील पत्रकार परिषदेत दिली.

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार पालिकेच्या जन्मदाखल्यात खाडाखोड करून एकच नोंदणी क्रमांक असलेले अनेक जन्मदाखले तयार करण्यात आले. तेच जन्मदाखले वास्तव्याचा दाखला मिळविण्यासाठी सादर केले. या रिक्षा चालकांनी सादर केलेल्या मूळ कागदपत्रांची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे.
निलेश फापाळे, समाजसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT