भाईंदर : राजू काळे
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील नवघर व जरीमरी तलाव परिसरात साकारण्यात आलेल्या श्री विठ्ठलाच्या ५१ फुटी भव्य मूर्तीची येत्या आषाढी एकादशीनिमित्त शिवसेनेने संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून तर भाजपने महापौरांच्या माध्यमातून अनुक्रमे महाआरती व पूजेच्या आयोजनासाठी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
या दोन्ही पक्षांना विठ्ठल भक्तीची आस लागली असतानाच यातील संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्टला पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. तर पालिकेने महापौरांच्या पत्रावर अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे समोर आले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून भाईंदर पूर्वेकडील नवघर तलाव व काशिगाव येथील जरीमरी तलाव परिसरात श्री विठ्ठलाची ५१ फुटी भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीची येत्या आषाढी एकादशीनिमित्त महाआरतीच्या आयोजनासाठी सरनाईक यांनी त्याच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडे १६ जुलै रोजी पत्रव्यवहार केला आहे.
तत्पूर्वी महापौर डिंपल मेहता यांनी ३० जून रोजी आयुक्तांकडे पत्रव्यवहार करून त्यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची येत्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा केली जाणार आहे. त्याच धर्तीवर नवघर तलाव व जरीमरी तलाव परिसरात साकारण्यात आलेल्या श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीची पालिकेतील पदसिद्ध आधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा, अभिषेक, आरती व भजन-कीर्तनाचे आयोजन करण्याचे म्हटले आहे. मात्र श्री विठ्ठलाची शासकीय पूजा प्रथम पालिकेमार्फत करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी आयुक्तांना केली आहे.
शिवसेनेने संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्ट तर भाजपने महापौरांच्या माध्यमातून एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत आयुक्तांना पत्रव्यवहार केल्याने प्रशासन तूर्तास बुचकळ्यात पडले आहे.
सरनाईक यांनी गतवर्षी नवघर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या महाआरतीची घोषणा आपणच केल्याचे पत्रात म्हटले आहे. यामुळे यावर्षीची महाआरती नैतिक, सामाजिक व जनभावनेशी निगडीत जबाबदारी आपली असल्याने एकाच ठिकाणी एकाच वेळेस दोन स्वतंत्र कार्यक्रमाच्या आयोजनामुळे गोंधळ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. यासाठी ट्रस्टच्या मागणीनुसार महाआरतीची परवानगी संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्टलाच द्यावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली.
दरम्यान त्यावर आयुक्तांनी प्रभाग समिती क्रमांक ३ चे अधिकारी जितेंद्र कांबळे यांना परवानगी देण्याबाबत निर्देश दिल्यानंतर प्रभाग अधिकाऱ्यांनी २० जुलै रोजी ट्रस्टला महाआरतीची परवानगी दिली. तर महापौरांच्या पत्रावर प्रशासनाने अद्याप तरी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे समोर आले आहे.
एकाच ठिकाणी एकाच वेळी भिन्न कार्यक्रम
संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्टने केवळ नवघर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीची महाआरती करण्याचे नियोजन केल्याने प्रशासनाने महापौरांच्या मागणीच्या अनुषंगाने काशिगाव येथील जरीमरी तलाव परिसरातील श्री विठ्ठल मूर्तीच्या पूजा-अर्चेचे आयोजन करावे, अशी अपेक्षा श्री विठ्ठल भक्तांकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे एकाच ठिकाणी एकाच वेळी दोन भिन्नभिन्न कार्यक्रमांचे आयोजन टाळण्यात येऊन शिवसेना व भाजपमध्ये वाद निर्माण होणार नसल्याचे म्हटले आहे.