डोंबिवली: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सुधारित पाणीपुरवठा कपातीसंबंधी सूचना जारी केली आहे. जांभूळ आणि शहाड केंद्रातून केला जाणारा पाणी पुरवठा शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून ते रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे एमआयडीसीच्या डोंबिवली विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या सूचनांनुसार एमआयडीसीच्या डोंबिवली विभागीय कार्यकारी अभियंता एस. व्ही. राऊत यांनी या सूचनेची प्रत कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिका आयुक्त, तळोजा-डोंबिवली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि संबंधित ग्रामपंचायतींना पाठविली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांसह ग्रामपंचायती, ग्राहक रहिवासी आणि पाणी पुरवठ्याच्या इतर ग्राहकांनी या सूचनेची दखल घेऊन पाण्याचे नियोजन करावे. पाण्याचा पुरेसा साठा करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अलनिनो व आयओडीच्या प्रभावामुळे समुद्र प्रवाह सक्रिय झाल्याने पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. या संदर्भात जलसंपदा विभागासोबत १९ जून रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पाणी कपात करण्याचे ठरले आहे.
त्याअनुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा दर बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असल्याबत सूचना देण्यात आली होती.
परंतु येत्या शुक्रवारी २६ जून रोजी मोहरम हा सण असल्याकारणाने या आठवड्यात जांभूळ आणि शहाड जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी २६ जून रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते रविवारी २८ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
उद्योजकांत संभ्रमावस्था
गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसीकडून पाणी पुरवठा कपातीबाबत सूचना येत आहेत. त्यात कधी अंबरनाथ एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्याकडून सूचना काढण्यात येते, त्यापाठोपाठ तशीच सूचना डोंबिवली एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्याकडून काढण्यात येते.
दोन दिवसांपूर्वी काढलेल्या सूचनेत गुरूवार/शुक्रवार असे पूर्ण दोन दिवस म्हणजे ४८ तास पाणी पुरवठा बंद राहील असे म्हटले होते. ही सूचना येऊन दोन दिवस झाले नाहीत तोपर्यंत बदल झालेली दुसरी सूचना ग्राहकांना पाठविण्यात आली. त्यामुळे रहिवाशांसह उद्योजकांत गोंधळ निर्माण झाला आहे.
ग्राहकांत संताप
शुक्रवारी पूर्ण दिवस म्हणजे गुरूवारी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद राहील, अशी सूचना यापूर्वी गेल्या कैक वर्षांपासून दिली जायची. त्यानंतर ही वेळ बदलून गुरूवारी दुपारी १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पाणी पुरवठा २४ तास बंद राहील अशी सूचना येऊ लागली.
नुकतीच दोन दिवसांपूर्वी बुधवारी रात्री १२ वाजता ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत अर्थात गुरूवार ते शुक्रवार दरम्यान पाणी पुरवठा ४८ तास बंद राहील अशी सूचना देण्यात आली होती. एमआयडीसीच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. राऊत यांनी सोमवारी २२ जून रोजी काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे पुन्हा त्या सूचनेत बदल करून शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजे शनिवार/रविवार पूर्ण दोन दिवस ४८ तास पाणी पुरवठा बंद राहील, अशी सूचना आली आहे.
सूचनांनुसार पाणी वितरण होत नसल्याचा आरोप
अशा वेगवेगळ्या सूचना आपल्या भागाला अथवा गावाला/शहराला लागू आहेत का ? असा प्रश्न विचारला जात आहे. शिवाय शनिवार/रविवार पाणी पुरवठा बंद संदर्भात केलेला बदल रहिवासी आणि उद्योजकांच्या संघटनांना रूचला नाही. किमान आमच्याशी चर्चा करायला हवी होती, असे संघटनांचे म्हणणे आहे.
या सूचनेत दिलेल्या मुदतीनंतर कित्येक तास पाणी पुरवठा वेळेवर सुरू होत नाही, असे एमआयडीसीच्या ग्राहकांचे म्हणणे आहे. असे बदल कुण्या व्हीआयपीच्या सांगण्यावरून त्यांच्या सोयीसाठी केला असल्याची चर्चा डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकांसह निवासी विभागातील रहिवाशांमध्ये रंगली आहे.