भाईंदर : राजू काळे
मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील डोंगरी येथील नियोजित मेट्रो कारशेडमधील जागेत काही भ्रष्ट अधिकार्यांच्या पाठबळामुळे झोपडी माफियांनी अनधिकृत झोपड्या बांधल्याचे वृत्त दैनिक पुढारीने 28 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पालिकेने 40 हुन अधिक झोपड्या जमीनदोस्त केल्या. तर उर्वरीत सुमारे 35 झोपड्यांचा लेखाजोखा महसूल विभागासह एमएमआरडीएला सादर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यातील सुमारे 13 ते 15 झोपड्या एका स्थानिक बिल्डरच्या जागेत बांधण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर हि जागा देखील महसूल विभागाचीच असून तो बिल्डर या जागेतील कब्जेदार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य शासनाकडून एमएमआर रिजनमधील मेट्रोचे जाळे एमएमआरडीएच्या निधीतून निर्माण केले जात असून विविध मेट्रो प्रकल्पातील कारशेड ठिकठिकाणी साकारले जात आहेत. याच धर्तीवर शासनाने अंधेरी ते दहिसर मेट्रो प्रकल्प क्रमांक 7 व दहिसर ते भाईंदर मेट्रो प्रकल्प क्रमांक 9 साठी उत्तनच्या डोंगरी येथील सर्वे क्रमांक 19 वरील 59 हेक्टर 79 एकर शासकीय जागेत कारशेड नियोजित केली आहे.
दरम्यान हि कारशेड मोर्वा गावाकडील खोपरा गावात असलेल्या 100 एकर खाजगी जागेत साकारण्यासाठी त्या जागामालकांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. यामुळे कारशेड नेमकी कुठे साकारणार, यावर अद्याप निर्णयु झाला नसतानाच यातील डोंगरी येथील नियोजित कारशेडच्या जागेत मोबदला लाटण्याच्या लालसेपायी अनधिकृत झोपड्या उभारल्या जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. त्याचे वृत्त दैनिक पुढारीने 28 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले. त्याची दाखल पालिकेसह विविध स्तरावर घेण्यात आली असली तरी महसूल विभाग व एमएमआरडीएने मात्र अद्यापही गांधारीचे भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.