ठाणे : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला कडाडून विरोध दर्शविल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयामधील वृक्षतोडीच्या फतव्याविरोधात दंड थोपटले आहेत. शुक्रवारी (12 डिसेंबर) मनसे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनोरुग्णालयात पाहणी करून एकही वृक्ष तोडू देणार नसल्याचा इशारा दिला. तसेच, येत्या काही दिवसात मनोरुग्णालयातील वृक्ष वाचवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः ठाण्यात येणार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.
नाशिकच्या तपोवनानंतर ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाण्यातील ब्रिटिशकालीन प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात 3 हजार 300 बेडचे बंगलोरच्या धर्तीवर नविन मनोरुग्णालय उभारण्यात येत आहे. या बांधकामाच्या आड येणाऱ्या 1614 झाडांपैकी 700 हून अधिक झाडे बाधित होणार आहेत. वृक्षतोडीच्या वृत्तानंतर ठाणेकरांमध्ये संताप व्यक्त होत असल्याने शुक्रवारी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मनोरुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. प्रशासन आणि बिल्डरांकडून जागा लाटण्याकरिता हे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप करून मनसे नेते अविनाश जाधव यांनी याठिकाणी सेंट्रल पार्क तयार करावे अशी मागणी केली आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः देखील ठाणे मनोरुग्णालयात भेट देऊन वृक्षांची पाहणी करणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. मनोरुग्णालयातील एकही झाड तोडून देणार नाही. असा इशारा मनसेने दिला असून या वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमी आणि ठाणेकरांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.