Meenakshi Shinde Resignation Pudhari
ठाणे

Meenakshi Shinde Resignation: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण; मीनाक्षी शिंदे यांनी दिला महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा

Meenakshi Shinde Resignation: मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.

Rahul Shelke

Meenakshi Shinde Resignation: शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र, या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या हत्येमागील कटात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा सहभाग असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.

या प्रकरणामुळे शिंदे गटाच्या राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली होती. मंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी मीनाक्षी शिंदे यांच्या पदाबाबत सूचक विधान केले होते. एखाद्या नेत्यावर गंभीर आरोप झाले असतील, तर ते आरोप खोटे सिद्ध होईपर्यंत संबंधित नेत्याने स्वतःहून पक्षाचे पद बाजूला ठेवणे योग्य ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. ही भूमिका आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्याचेही सरनाईक यांनी सांगितले होते.

सरनाईक यांच्या या विधानानंतर मीनाक्षी शिंदे यांच्या पदाबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. आता त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.

दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना उलटूनही या प्रकरणात मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई झाली नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांनी सर्वपक्षीय मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठाण्याच्या राजकारणात मीनाक्षी शिंदे यांचे महत्त्वाचे स्थान मानले जाते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील तपासातून समोर येणारे निष्कर्ष याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT