स्वतःची वाहने आणणार्‍या पर्यटकांना दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याने वाहतुकीची कोंडी पहावयास मिळत आहे. Pudhari News Network
ठाणे

Matheran Traffic | माथेरानमधील वाहतूककोंडीचा तिढा सुटे ना!

उपाययोजना करण्याची पर्यटकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

माथेरान : मिलिंद कदम

विकेंडला माथेरानमध्ये मर्यादेपेक्षाही अधिक पर्यटकांची मोठया प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. स्वतःची वाहने आणणार्‍या पर्यटकांना दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याने वाहतुकीची कोंडी पहावयास मिळत आहे. लवकरच यावर तोडगा काढला पाहिजे अशी पर्यटकांमधून मागणी केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी श्रमदान करून काहीअंशी पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला होता. परंतु माथेरानकडे पर्यटकांचा ओघ विकेंडला वाढतच असल्यामुळे दस्तुरी नाक्यावर शासकीय अधिकारी वर्गाला सुध्दा वाहनांना वाहतुकीसाठी मार्ग काढून देणे त्रासदायक बनलेले आहे.

पार्किंगच्या ठिकाणी झाडांच्या भोवताली जांभ्या दगडांचे कठडे बांधले आहेत, त्यामुळे जागा व्यापलेली आहे. पार्किंगच्या जागेत जे काही अडथळे निर्माण झाले आहेत ते काढून टाकल्यास वाहनांची पार्किंग सुरळीतपणे होऊ शकते. जवळपास सर्व जागा ही वनखात्याच्या अखत्यारीत येत आहे आणि नगरपालिका सुध्दा वाहन कर आकारणी करते त्यामुळे या दोन्ही खात्यांनी मिळून पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे. तेव्हाच वाहतूककोंडी संपुष्टात येईल असे बोलले जात आहे.

आपण नियोजित केलेल्या जागेत बहुतांश गाड्या पार्क झाल्या आहेत. पुढील जागेत पावसामुळे दल दल झाल्याने गाडी अडकण्याची भीती असल्याने काही गाड्या पार्क होऊ शकल्या नाहीत परंतु लवकरच चिखलमय दलदलीची जागा व्यवस्थित करण्याची उपाययोजना सुरु करण्यात येईल.
योगेश जाधव, अध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, माथेरान
आज माथेरानलासुद्धा सकाळीच लोंढेच्या लोंढे येत आहेत. अति गर्दी झालीय. गाडी नेरळच्या दिशेनेसुद्धा एक इंच पुढे जात नाही. आपल्या शहराची एवढी लोकसंख्या सामावून घ्यायची क्षमताच नाही. त्याकरीता अवश्यक ’इन्फ्रास्ट्रक्चर’ नाही. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेवरसुद्धा प्रचंड ताण येतो. एवढे पर्यटक आल्यामुळे त्यांना किती आनंद मिळत असेल हादेखील संशोधनाचा विषय आहे. आपल्याला कठोर उपाययोजना करावी लागेल. तरच यावर नियंत्रण मिळवता येईल. एवढे लोक आज माथेरानमधे दाखल होतील. पण लॉजींगचे बहुतेक रुम खालीच राहतील.
मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष, माथेरान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT