नेवाळी : अंबरनाथ तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या ऐतिहासिक श्रीमलंगगडच्या डोंगराला गुरुवारी सायंकाळच्या सुमारास भीषण वणवा लागला. काही वेळातच या वणव्याने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण परिसर धुराने व्यापला गेला असून आगीवर नियंत्रण मिळवणे वनविभागासाठी मोठे आव्हान ठरत आहे. डोंगर उतारांवर कोरडी झाडे, गवत आणि दाट झुडपांमुळे आग वेगाने पसरत असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ तालुक्यातील डोंगराळ भागात सातत्याने वणव्याच्या घटना घडत आहेत. नुकताच खरड गावाच्या हद्दीतील डोंगराला वणवा लागून मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली होती. त्या घटनेचे पडसाद ताजे असतानाच आता श्रीमलंगगड परिसरात पुन्हा वणवा लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीमलंगगड परिसर हा सह्याद्री पर्वतरांगेचा भाग असल्याने येथे बिबट्यासह विविध वन्यजीवांचा अधिवास आहे.
गेल्या काही दिवसांत या भागात बिबट्यांचा वावर नागरिकांनी पाहिल्याच्या घटना समोर आल्या होत्या. अशातच वणव्यामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचे मोठे नुकसान होत असून प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आसपासच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वणव्यामागील कारणांचा तपास सुरू
वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असले तरी डोंगराचा कठीण भूभाग, वाऱ्याचा वेग आणि कोरडे वातावरण यामुळे अडचणी येत आहेत. दरम्यान, वणव्यामागील कारणांचा तपास सुरू असून नागरिकांनी डोंगराळ भागात आग लावण्यासारख्या कृत्यांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.