ठाणे : ठाण्यातील गावदेवी परिसरातील भाजी मंडईच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. आग विझविण्याचा प्रयत्न करत असताना पालिकेचा सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन जवानाचा या घटनेत गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर भाजी मंडईमध्ये असलेले 155 गाळे जाळून खाक झाले आहेत.
आगीची तीव्रता एवढी जास्त होती कि भाजी मंडईच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या काही गाळ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. साडेतीनच्या सुमारास घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाला तब्ब्ल 9 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अतिशय वर्दळीच्या असलेला हा परिसर असून ही आग पहाटे लागल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने गावदेवी परिसरात भाजी मंडईसाठी इमारत बांधण्यात आली आहे.या इमारतीमध्ये कपडे, विविध प्रकारच्या वस्तू आणि भाजीची अशी 155 दुकाने आहेत. नागरिकांना चालायला जागा नसते असा हा अतिशय वर्दळीचा परिसर आहे. भाजी मंडईच्या इमारतीला आग लागली असल्याची माहिती मध्यरात्री 1.30 च्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन विभागाला भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी दिली.
मात्र जवाहरबाग मधले हे अग्निशमन केंद्र रुस्तमजी या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याने अग्निशमन विभागाला यायला वेळ झाला. त्यामुळे पावणे चारच्या सुमारास आग विझवण्यास सुरुवात करण्यात आली. नौपाडा पोलीस, महावितरण कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान 5- फायर वाहनासह, 03- जम्बो वॉटर टँकर, 02- वॉटर टँकरसह, 4 -रेस्क्यू वाहनासह व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यामध्ये आग विझविण्याचा प्रयत्न करत असताना काळू शंकर गाडेकर (53 वर्षे, ठाणे महानगरपालिका, आरक्षक) आणि सागर शिंदे (43 वर्षे, ठा. म. पा. अग्निशमन केंद्र, स्थानक अधिकारी) या दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. तर सुजित पष्टे (वय 45 वर्षे, ठा. म. पा. अग्निशमन केंद्र, स्थानक अधिकारी) आणि समीर जाधव (40 वर्षे, ठा. म. पा. अग्निशमन केंद्र, तांडेल) हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सुदैवाने ही आग मध्यरात्री लागल्याने मोठी जीवितहानी टळली. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.