

ठाणे : ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केट इमारत, गोखले रोड, नौपाडा, ठाणे, (प.) या ठिकाणी गावदेवी भाजी मार्केटमध्ये आग भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी (दि.21) पहाटे समोर आली. ही आग नियंत्रणात आणतांना ठाणे महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गुरुवारी (दि.21) पहाटे 3.43 वाजताच्या सुमारास गावदेवी भाजी मार्केट इमारत, गोखले रोड, नौपाडा, ठाणे, (प.) या ठिकाणी गावदेवी भाजी मार्केटमध्ये आग लागल्याची घटना समोर आली. यावेळी नौपाडा पोलीस, महावितरण कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ५- फायर वाहनासह, ०३- जम्बो वॉटर टँकर, ०२- वॉटर टँकरसह, ४ - रेस्क्यू वाहनासह व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.
यावेळी आगीवर नियंत्रण मिळवतांना काळू शंकर गाडेकर (५३ वर्षे, ठाणे महानगरपालिका, आरक्षक) आणि सागर शिंदे (४३ वर्षे, ठा. म. पा. अग्निशमन केंद्र, स्थानक अधिकारी) या दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर सुजित पष्टे (वय ४५ वर्षे, ठा. म. पा. अग्निशमन केंद्र, स्थानक अधिकारी) आणि समीर जाधव (४० वर्षे, ठा. म. पा. अग्निशमन केंद्र, तांडेल) हे दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्याकडून विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.