ठाणे : शहरातील नौपाडा भागात उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या गिरीराज ड्रीम्स टॉवरमध्ये शनिवारी रात्री अग्नितांडव पाहायला मिळाला. इमारतीच्या सव्विसाव्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण फ्लॅट जळून खाक झाला. आग लागल्याची माहिती कळताच गृहसंकुलातील रहिवासी भीतीपोटी रात्री सैरावैरा पळत सुटले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी या आगीमुळे शहरातील भल्यामोठ्या टॉवरच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ठाणे स्थानकापासून नौपाडा हा भाग अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे हा परिसर शहरातील एक महत्त्वाचा परिसर मानला जातो. या परिसरात बाजारपेठ असून मोठमोठी दुकाने आहेत. तीन ते चार मजली इमारतींसह या परिसरात अनेक उच्च मजली इमारती देखील आहेत. तर, या परिसरात काही शाळा देखील आहेत.
याच परिसरात भास्कर कॉलनी परिसरातील सर्वात मोठी अशी गिरीराज ड्रीम्स ही भलीमोठी तळ अधिक 30 मजली इमारत आहे. या इमारतीतील 26 व्या मजल्यावरील मिलिंद देसाई यांच्या फ्लॅटमध्ये शनिवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे गृहसंकुलात भितीचे वातावरण पसरले. नेमकी ही आग कशी लागली याची चर्चा रंगली. इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरात देखील या आगीमुळे खळबळ उडाली होती.
या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाने धाव घेतली. 26 व्या मजल्यावरील देसाई यांच्या घरातील बेडरूममध्ये लागली. आग लागली त्यावेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते. आगीमुळे धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले होते. आग लागल्याचे समजताच इमारतीतील नागरिक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून इमारतीच्या बाहेर पडले.
तारांगण दुर्घटनेची आठवण
आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून विझविण्यात आली. या आगीत बेडरूममधील पंखा, एसी युनिट, कपाट, बेड, कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, या आगीने तारांगण दुर्घटनेची आठवण अग्निशमन दलाच्या जवानांना झाली.