डोंबिवली : ठाणे आणि डोंबिवलीत राहणाऱ्या दोन इसमांनी डोंबिवलीत राहणाऱ्या वेगवेगळ्या दोघा महिलांना बनवाबनवी करत गंडा घातला आहे. कुटुंबियांसह राहणाऱ्या या महिलांची एकूण एक कोटी 55 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या दोन्ही फसवणूक प्रकरणांची विष्णूनगर पोलिस ठाण्यात डोंबिवलीतील दोन स्वतंत्र गन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील पहिल्या प्रकरणात तक्रारदार महिला 30 वर्षाची, तर दुसरी महिला 44 वर्षांची आहे.
यातील 44 वर्षांची महिला पंजाबी असलेल्या पतीशी न पटल्याने विभक्त होऊन आपल्या मुलासह पश्चिम डोंबिवलीतील आईच्या घरी राहते. या महिलेने कुटुंबीयांच्या सहमतीने पनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने जीवनसाथी या विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली. संकेतस्थळावरील नोंदणीतून अनिल अजित दातार नामक इसमाने या महिलेशी संपर्क साधला. आपण विवाहासाठी इच्छक असल्याचे त्याने या महिलेला कळविले.
अनिल दातार हे डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या मानपाडा रोडवरील विजया बँकेसमोरच्या परिसरात राहतात. महिलेच्या कुटुंबियांना अनिलचा स्वभाव पटला. आपला व्यवसाय असल्याचे अनिल यांनी पीडित महिलेला सांगितले. अनरूप पती मिळत असल्याने या महिलेने अनिलशी बोलणे सरू ठेवले. पिडीत महिला आणि अनिल यांच्याशी विवाहाविषयी बोलणी सरू झाली.
याच दरम्यान अनिलने आपला पहिला विवाह झाला असल्याचे सांगून घटस्फोट दिल्याने आपण तात्काळ लग्न करू, असे या महिलेला अभिवचन दिले. मात्र या प्रकारानंतर अनिलने घटस्फोटाच्या प्रक्रिया पार पडण्यासह पिडीत महिलेच्या भावाला नोकरी लावण्याकरिता दिल्लीतील आपल्या सहकाऱ्याला आलेली आर्थिक अडचण, आदी विविध कारणे सांगून पिडीत महिला, तिचे कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून सन 2023 ते जून 2025 या कालावधीत एकूण 62 लाख 75 हजार रूपये उकळले.
पिडीत महिलेने विश्वास ठेऊन घरातील सर्व पैसा-अडका देऊन अनिल दातारने केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दाग-दागिने गहाण ठेवून त्याला पैसे दिले. परिणामी पिडीत महिलेसह तिच्या कुटुंबावर हलाखीची वेळ आली. अनिल दातारने आपणास दिल्ली येथे नोकरी लागली आहे.
चेन्नई येथे कामासाठी जात आहोत, अशी कारणे सांगून पिडीत महिला आणि तिच्या कुटुंबीयांशी बोलणे टाळू लागला. अनिलने आपली फसवणूक केल्याची खात्री पटल्यानंतर पिडीत महिलेने विष्णूनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
ईडीच्या धाडीत 1.56 कोटींचा ऐवज जप्त केल्याचा कांगावा
ठाण्यातील उच्चभ्रूंची सोसायटी असलेल्या हिरानंदानी इस्टेटमध्ये राहणाऱ्या शैलेश प्रकाश रामगुडे (30) याने तर कहरच केला. इन्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून पश्चिम डोंबिवलीत राहणाऱ्या 30 वर्षीय तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून 92 लाख 75 हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पिडीत तरूणीने विष्णूनगर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. शैलेश रामगडे याने हा सारा प्रकार सप्टेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 कालावधीत केला आहे.
शैलेश याने पिडीत तरूणीशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली. त्यानंतर तिला लग्नाचे अमिष दाखविले. आपल्या घरावर ईडीची धाड पडली आहे. घरातील 2 किलो सोने, एक कोटी रूपये ईडीने जप्त केले आहेत. ते सोडविण्यासाठी शैलेश याने पिडीत तरूणीकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 92 लाख 75 हजार रूपयांचा ऐवज उकळला. कालांतराने त्याने पिडीत तरूणीशी संपर्क तोडला. आपली फसगत झाल्याची खात्री पटल्यानंतर मात्र पिडीत तरूणीने विष्णूनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन कैफियत मांडली.
पोलिसांनी या प्रकरणी पोलिसांनी पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून शैलेश रामगुडे याच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 318 (4), 316 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.