Eknath Shinde Pudhari
ठाणे

Drought Affected Farmers: विकासकामांच्या दर्जाबाबत अधिकारी, नगरसेवकांना उपमुख्‍यमंत्र्यांच्या कानपिचक्या

'दुष्काळामुळे शेतकऱ्यांनो टोकाचे पाऊल उचलू नका, खचून जाऊ नका, आत्महत्या करू नका'

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: मराठवाडा, विदर्भातील दुष्काळामुळे कुठल्याही शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलू नका, तुम्ही खचून जाऊ नका, आत्महत्या करू नका. बळीराजाचा पहिला अधिकार हा सरकारच्या तिजोरीवर आहे. सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना कधीही संकटात सोडणार नाही.

शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारसोबत नागरिकांचीही जबाबदारी असून लाखो शहरी नागरिकांनी सण-उत्सव साधेपणाने साजरा करून उरलेले पैसे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यातील नागरिकांना केले आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी विकासकामांच्या दर्जाबाबत अधिकारी, नगरसेवकांना कानपिचक्याही दिल्या. ठाणे महापालिकेचा ४४ वा वर्धापन दिवस गडकरी रंगायतन येथे साजरा करण्यात आला. यावेळी ठाणे महापालिका क्षेत्रातील गुणवंतांचे ठाणे भूषण, ठाणे गौरव आणि ठाणे गुणीजन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यावेळी बदलते ठाणे, विकसित ठाणे आणि ठाणे महापालिकेच्या विकासकामांचे कौतुक करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे हात पुढे करण्याचे आवाहन केले.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह गटनेते, विविध प्रभागांचे अध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री शिंदे यांनी ठाण्यातील विकासकामांची जंत्री वाचून सर्व अधिकाऱ्यांनी गुणवत्तापूर्ण कामे करावी, असे निर्देश दिले आहेत. एकदा निवडून आल्यानंतर नगरसेवकांनी आपल्या वॉर्ड हा स्वतःचा सातबारा आहे, असे समजण्याचे कारण नाही. आपल्या वॉर्डमध्ये जनतेची कामे करावी, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान यावेळी शिंदे पुढे म्हणाले, अधिकाऱ्यांबरोबर नगरसेवक म्हणून आपल्या वॉर्डमधील विकास कामे ही दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, चांगली आणि मुदतीत होतात की नाहीत, याकडे लक्ष द्यायला हवे. जे चांगले काम करतील ते निवडून येतील असे म्हणत ठाण्यातील नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.

ठाण्यात चांगल्या सुविधा मिळतात म्हणून लोक मोठ्या प्रमाणावर राहायला येतात. सर्वात जास्त निधी ठाणे महापालिकेला मिळालेला आहे. त्यामुळे पालिकेने आपले दायित्व पार पाडावे, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT