ठाणे ः ओटीटी, समाज माध्यमे आणि चित्रपटांच्या गदारोळातही मराठी नाटकांनी गेल्या वर्षभर चांगलाच जम बसवला. रंगभूमीवरील नाटकांना पुन्हा अच्छे दिन अनेक नाटकांच्या पाट्यांवर हाऊस फुल्लचे बोर्ड झळकले. मराठी नाटकांकडे प्रेक्षकांची वळलेल्या पावलांचे स्वागत करत नाट्य निर्माते आणि लेखक - दिग्दर्शकांनी रंगभूमीवर नव्या वर्षात गंभीर, विनोदी, गूढ नाटके करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे 2026 या वर्षात मराठी प्रेक्षकांना दर्जेदार मराठी नाटकांची मेजवानी मिळणार आहे. मोठ्या पडद्यावरील कलाकारही नाटकांमध्ये भूमिका करणार असल्याने 2026 या वर्षातही मराठी नाटकाच्या प्रेक्षकांचा टक्का वाढणार आहे.
कोरोना नंतर वेग धरलेल्या ओटीटी माध्यमांपुढे विशेषतः अपवादात्मक मराठी चित्रपट सोडता इतर चित्रपट गल्ल्याच्या बाबतीत डब्ब्यातच जमा झाले आहेत. प्रेक्षकांचा ओटीटी माध्यमांकडे वाढत्या ओढ्यामुळे बदलत चाललेल्या अभिरूचीपुढे मराठी नाटके पुन्हा तग धरतील का अशी स्थिती असतांनाच सातत्य, दर्जा आणि प्रयोगशीलता यामुळे अनेक नाट्य निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांनी शो मस्ट गो ऑन म्हणत धीर एकवटला. यामुळे कोरोना नंतर मराठी रंगभूमी पुन्हा चर्चेत आली, रंगभूमीवर यश मिळवलेल्या चारचौघी, वस्त्रहरण, ऑल दि बेस्ट, एका लग्नाची पुढची गोष्ट, सही रे सही या नाटकांच्या प्रयोगांनी प्रेक्षक कायम राखला, परंतू त्याचबरोबर नव्या संचासह रंगभूमीवर आलेल्या हिमालयाची सावली, पुरूष, सखाराम बाईंडर कुणी तरी आहे तिथं अशा दिगगज कलाकरांनी संपन्न केलेल्या नाटकांनाही प्रेक्षकांनी दाद दिली.
याशिवाय नव्या पिढीला आकर्षित करणारे संगीत देवबाभळी, जर तरची गोष्ट, कुटुंब किर्रतन, नियम व अटी लागू , भूमिका, फिल्टर कॉफी, चिरंजीव परफेक्ट बिघडलाय, प्राजक्त देशमुख लिखित करूणाष्टके या नव्या प्रयोगाने प्रेक्षक काबीज केला. रंगभूमीला हात देणार्या या नव्या - जुन्या नाटकांना सह नव्या वर्षात नव्या आशय- विषयाची भर रंगभूमीवर पडणार आहे.
गूढ सविता दामोदर परांजपे हे नाटक नव्या संचासह रंगभूमीवर
रंगभूमीवर गाजलेले गूढ सविता दामोदर परांजपे हे नाटक 20 वर्षांनी नव्या संचासह रंगभूमीवर येत आहे. एकदा पहावं करून, शंकर जयकिशन, लग्नपंचमी, ठरलंय फॉरएव्हर या नाटकांच्या शुभारंभाचे प्रयोग झळकत आहे. या नाटकांमध्ये महेश मांजरेकर, आनंद इंगळे, वैभव मांगले यांच्यासह मोठ्या पडद्यावर कार्यरत असलेल्या स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर यांच्यासारखे तगडे कलाकार रंगभूमी गाजवणार आहेत.