

कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरेचा मानदंड ठरलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह इमारत दुर्घटनेला उद्या, शुक्रवारी (दि. 8) एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. दुर्घटना घडली की आणखी काही? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. राजवाडा पोलिसांनी चौकशीला गती दिली. तपासाची व्याप्ती वाढविली. 40 जणांकडे चौकशीचा ससेमिरा लावला, तरीही तपास पथकाच्या हाती कोणतेही धागेदोरे लागू शकले नाहीत. अखेर पोलिसांनी दुर्घटनेच्या तपासाची फाईलच बंद केली आहे.
गतवर्षी गुरुवार दि. 8 ऑगस्ट 2024 रात्री संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली. केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या भीषण दुर्घटनेत नाट्यगृह जळून भस्मसात झाले. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. पाण्याचा मारा केला. तरीही दुसर्या दिवशी शुक्रवारी पहाटेपर्यंत आग धुमसतच राहिली. नाट्यगृहाच्या दगडी बांधकामाचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला.
नाट्यप्रेमींसह कोल्हापूरकर हळहळले. महापालिकेने नियुक्त केलेल्या चार सदस्यीय समितीसह न्यायवैद्यकशास्त्र (फॉरेन्सिक) पथकानेही जळालेल्या नाट्यगृहाची पाहणी केली. शासनस्तरावरूनही भीषण दुर्घटनेची दखल घेण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले.
राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे दुर्घटनेचा स्वत: तपास करीत होते. महापालिकेतील अधिकारी, कर्मचार्यांसह सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे परिसरातवावर असलेल्या 40 जणांकडे चौकशी केली. मात्र, त्यातून अखेरपर्यंत तपास पथकाच्या हाती काहीही ठोस धागेदोरे लागले नाहीत. तपास पथकाची यंत्रणा आठ महिने चौकशी प्रक्रियेत गुंतली होती. मात्र, चौकशीतून काहीही ठोस धागेदोरे हाती न लागल्याने राजवाडा पोलिसांनी तपासाची फाईलच बंद केली आहे.
नाट्यगृहाचे अतिरिक्त व्यवस्थापक समीर इस्माईल महाब्री (रा. शहाजी वसाहत, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अनोळखीविरुद्ध फिर्याद दाखल केली. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी नाट्यगृहाला आग लावली असावी, अशीही त्यांनी शंका व्यक्त केली. या दुर्घटनेत खासबाग कुस्ती मैदानाकडील मुख्य मंच आणि संपूर्ण नाट्यगृह भस्मसात होऊन सुमारे 16 कोटी 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.