मुरबाड शहर : नव्याने रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम प्रगतीपथावर असलेल्या मुरबाड-कल्याण राष्ट्रीय महामार्ग 61 वर लावण्यात आलेल्या मराठीत्तर सूचना फलकांवरून मराठी भाषेच्या उपेक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, नुकत्याच साजऱ्या करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या धर्तीवर स्थानिक समाजमाध्यमातून याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.
मुरबाड-कल्याण हा मार्ग महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा राष्ट्रीय महामार्ग असून, या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदारांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी सूचना व दिशादर्शक फलक उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे फलक केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत असल्याने मराठी भाषेची गळचेपी होत असल्याचा आरोप मुरबाड प्रवासी संघटनेचे ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी केला आहे.
मराठी भाषा गौरव दिनी अशा प्रकारची बाब समोर येणे हे मराठी अस्मितेला लागलेले आव्हान असल्याचे मत नागरिकांमधूनही व्यक्त होत आहे.