भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने पालिकेत याच पक्षाचा महापौर बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र महापौर पदावर विराजमान होणारी व्यक्ती मराठी भाषिकच असावी, अशी आग्रही मागणी मराठी एकीकरण समितीने केली असून तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीच्या कालावधीत माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी मिरा-भाईंदर महापालिकेत उत्तरभारतीय महापौर बसणार असल्याचे विधान केले होते. त्यावेळी भाषिक वाद सुरू होऊन मराठी एकीकरण समितीने उत्तरभारतीय नव्हे तर मराठी भाषिकच होणार असल्याचा दावा केला. दरम्यान महापौर पदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नसताना महापौर कोणत्या भाषेचा असावा, यावरील चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे.
महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढली जाणार असल्याने त्याकडे शहरातील राजकारण्यांचे लक्ष लागून राहिले असतानाच महापौर कोणत्या भाषेचा बसणार, त्याचा वाद सध्या सुरू झाला आहे. पालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे पालिकेत भाजपचीच सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले असतानाच महापौर पदावर कोणत्या प्रवर्गातील नगरसेवकाची वर्णी लागणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
मात्र संभाव्य महापौर हा मराठी भाषिकच असावा, अशी आग्रही मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे. त्यासाठी त्यांनी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर फलक झळकावून तशी मागणी केली. तर भाजपचे स्थानिक नेतृत्व आ. नरेंद्र मेहता यांनी आरक्षण जाहीर होताच महापौर पदावर कोणाला बसवावे, त्याचा निर्णय पक्षाचे वरीष्ठ घेतील.
कोणी काय मागणी केली त्याला महत्व नसून पक्षाचे वरीष्ठ जो निर्णय घेतील त्यानुसारच संबंधित प्रवर्गातील नगरसेवकाची महापौर पदावर वर्णी लावली जाईल. मग तो कोणत्याही भाषेचा असला तरी चालेल, असा पावित्रा घेतला आहे. तर समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी महापौर पदावर मराठी व्यक्तीच बसली पाहिजे, अशी मागणी रेटून धरली असून तसे न झाल्यास त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. प्रसंगी रक्त सांडले तरी चालेल, असा निर्धार त्यांनी केला आहे.
मनसेकडूनही मराठी महापौराची मागणी
याबाबत समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे मिरा-भाईंदरमधील महापौर पद त्यावर संबंधित व्यक्ती विराजमान होण्याआधीच ते वादातिक बनल्याचे स्पष्ट झाले आहे. या वादात मनसेने सुद्धा उडी घेत मराठी भाषिक महापौराची मागणी केली आहे. मागणी करणारे सर्व मराठी भाषिक असले तरी त्यात काही अमराठी लोकांचा देखील भरणा असल्याचे दिसून येत आहे. यावरून मराठी भाषिक महापौराची मागणी नेमकी मराठी अस्मितेची की त्याला राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे, यावर संभ्रम निर्माण झाला आहे.