

मुंबई : गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाबाबत मोतीलाल नगर विकास समितीच्या नेतृत्वाखाली मोतीलाल नगर 1, 2, 3 मधील 23 रहिवाशांचे प्रतिनिधी मंडळ व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची म्हाडा मुख्यालयात भेट घेतली. या भेटीत रहिवाशांनी वाढीव क्षेत्रफळाच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
म्हाडाकडून निवासी गाळ्यांसाठी 1600 चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ आणि व्यावसायिक गाळ्यांसाठी 987 चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ दिले जाणार आहे. यावर रहिवाशांचा आक्षेप आहे. किमान 2 हजार चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या सदनिका मिळाव्यात अशी त्यांची मागणी आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मोतीलाल नगरच्या पुनर्विकास प्रक्रियेत डीसीपीआर 33(5) चे पालन व्हावे, समूह पुनर्विकासाअंतर्गत मिळणारा एफएसआय, प्रोराटा एफएसआय रहिवाशांमध्ये समान पद्धतीने विभागून निवासी गाळ्यांना 2400 चौरस फूट चटई क्षेत्रफळ व अनिवासी गाळ्यांना 2027 चौरस फूट चटई क्षेत्रफळ द्यावे, अशी मागणी केली.
केवळ 40 एकरवर वसलेल्या आराम नगरच्या रहिवाशांना 2 हजार चौरस फूट चटई क्षेत्रफळाचे घर आणि 143 एकरवर वसलेल्या मोतीलाल नगरच्या रहिवाशांना इतके कमी क्षेत्रफळ कसे, असा प्रश्नही यावेळी रहिवाशांनी उपस्थित केला. मोतीलाल नगरच्या वाढीव क्षेत्रफळावर म्हाडाच्या तज्ज्ञांनी अभ्यास करावा या मागणीचे निवेदन व व्यवहार्यता अभ्यास अहवाल जयस्वाल यांना देण्यात आला. बैठकीत व्यावसायिक गाळे मालकांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
निर्णय प्रक्रिया हातात असणारेच वाढीव क्षेत्रफळावर निर्णय घेऊ शकतील. 2021च्या शासन निर्णयात नमूद क्षेत्रफळानुसार प्रकल्प राबवणे एवढेच माझ्या हातात आहे. फारतर म्हाडाकडून झालेली बांधकाम क्षेत्रफळाची चूक दुरुस्त करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. कोणत्याही रहिवाशाला व्यावसायिक गाळे घ्यायचे असल्यास अथवा व्यावसायिक गाळे मालकांना निवासी गाळे घ्यायचे असतील तर मिळणाऱ्या लाभांबाबत स्वतंत्र अभ्यास करून, नियम व पात्रतेनुसार योग्य तो विचार केला जाईल. व्यावसायिक गाळे मालकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही.
संजीव जयस्वाल, उपाध्यक्ष, म्हाडा