Manvel Gaikwad Financial Crisis pudhari photo
ठाणे

Manvel Gaikwad Financial Crisis : ‘जवा नवीन पोपट हा...’ सह हजारो गाणी लिहिणाऱ्या मानवेल गायकवाड हलाखीत

टाळ्यांचा कडकडाट देणाऱ्यास महाराष्ट्र मात्र विसरला ; अर्धांगवायूचा झटका, पत्नीचे निधन, कधी औषध घ्यायचे की घरभाडे भरायचे, ही चिंता!

पुढारी वृत्तसेवा

डोळखांब : दिनेश कांबळे

‘जवा नवीन पोपट हा, लागला मिटू मिटू बोलायला...’ हे गीत सुरू होताच आजही महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांच्या आठवणी जाग्या होतात. या गाण्यावर तरुणाईने ताल धरला, अनेक गायकांनी ते आपल्या आवाजातून घराघरांत पोहोचवले आणि या गाण्याने असंख्य कलाकारांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. मात्र, हे शब्द लिहिणाऱ्या गीतकाराच्या आयुष्यात आज ना प्रसिद्धीची झगमग आहे, ना सुखाची सावली!

हजारो गाणी लिहून मराठी गीतसृष्टी समृद्ध करणारे शिघ्रकवी मानवेल गायकवाड आज शहापूर तालुक्यातील वाशिंद येथे भाड्याच्या घरात अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. कधी औषधांसाठी पैसे नाहीत, तर कधी सहा हजार रुपयांचे घरभाडे भरण्याची चिंता... ज्या लेखणीने लाखो लोकांचे मनोरंजन केले, तीच लेखणी आज स्वतःच्या जगण्याच्या वेदना मांडताना हतबल झाली आहे.

मुळचे अहिल्यानगर येथील रहिवासी असलेले कवी मानवेल गायकवाड पत्नीच्या निधनाने आणि शारीरिक व्याधींनी अक्षरशः हतबल झाले आहेत. गेली काही वर्षे ते शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील स्वामी विवेकानंद नगरमधील साई ईश्वर सोसायटीत भाड्याच्या घरात राहत आहेत. आयुष्यभर गीत लिहून इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या गीतकाराच्या स्वतःच्या आयुष्यात मात्र आज संघर्षाचेच सूर आहेत. त्यांच्या पत्नीचे सन २०२५ मध्ये निधन झाले.

मुलगा हाऊसकीपिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याच्यावरही पत्नी आणि दोन मुलांची जबाबदारी आहे. त्यातच मानवेल गायकवाड यांना सन २०१४ मध्ये अर्धांगवायूचा झटका आला. नियमित उत्पन्नाचा ठोस आधार नसल्याने हे भाडेही वेळेवर देणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरते. कधी औषध घ्यायचे की घरभाडे भरायचे, अशीच परिस्थिती या ज्येष्ठ गीतकाराच्या वाट्याला आली आहे. ज्या गीताने मानवेल गायकवाड यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ओळख मिळवून दिली, त्या ‘जवा नवीन पोपट हा, लागला मिटू मिटू बोलायला’ या गीताची निर्मिती सन १९८६ मध्ये एका कव्वालीच्या कार्यक्रमात झाली.

शिघ्रकवी गायकवाड यांनी हे गीत लिहिले आणि त्यानंतर आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांच्यासह अनेक टॉपच्या गायकांनी हे गीत आपल्या आवाजात गायले. पुढे त्यांच्या परवानगीने याच गाण्याचे हिंदी भाषांतर करून ‘पाप की दुनिया’ या हिंदी चित्रपटात ‘मै तेरा तोता, तू मेरी मैना’ या नावाने ते घेण्यात आले. यानंतर ‘आंटीची घंटी’, ‘पोर लई बारीक’, ‘मी बाबुराव बोलतोय’, ‘अंगात आलेला देव’, ‘नळावरचं भांडण’ यांसारखी अनेक लोकप्रिय लोकगीते त्यांनी लिहिली.

‘भिमाच्या सारखा बाळ जन्मा यावा’, ‘भिमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले’, ‘ए फॉर आंबेडकर’, ‘असं भीमाचं गाणं’ यांसारख्या प्रसिद्ध भीमगीतांचीही त्यांनी निर्मिती केली. इतकेच नव्हे, तर ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘करायला गेलो एक’, ‘विटी दांडू’, ‘आई’, ‘हिरवा चुडा सुवासिनीचा’ यांसारख्या चित्रपटांसाठी तसेच लोकगीत, लग्नगीत, भीमगीत आणि भक्तिगीत अशा विविध प्रकारांमध्ये आतापर्यंत तब्बल पाच हजार गाणी त्यांनी लिहिल्याचे सांगितले. दरम्यान, ज्यांच्या शब्दांवर महाराष्ट्र नाचला, त्याच गीतकाराच्या आयुष्यात आज दोन वेळच्या जगण्याचे सूर हरवले आहेत... ही पडद्यामागच्या कलाकारांच्या उपेक्षेची वेदनादायी कहाणी आहे.

बॉलिवूड टॉपच्या गायकांच्या आवाजांमागचे शब्द देणाऱ्या गीतकाराची झुंज

अजय देवगण निर्मित ‘विटी दांडू’ या चित्रपटासाठीही मानवेल गायकवाड यांनी गीते लिहिली. त्यांच्या लेखणीतून उतरलेली गीते प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, दिनकर शिंदे, सूर्यकांत शिंदे, राजू बागुल, साधना सरगम, सोनू निगम, अनुराधा पौडवाल, विनय मांडके, त्यागराज खाडिलकर, राहुल शिंदे, वैशाली सामंत, महमद अजीज, आदर्श शिंदे, चंद्रकांत शिंदे, चंद्रशेखर गाडगीळ, सुष्मादेवी, किरण पाटणकर, अंजली भारती, उदित नारायण यांसारख्या त्याकाळच्या टॉपच्या गायकांनी गायली. त्यांच्या गीतांना मिळालेल्या लोकप्रियतेमुळे अनेक कलाकार आर्थिकदृष्ट्याही सक्षम झाले. मात्र या लोकप्रियतेच्या झगमगाटापासून गीत लिहिणारा पडद्यामागचा कलाकार मात्र दूरच राहिला.

युरोपमधील पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाण्याचीही आर्थिक परिस्थिती नाही

आज परिस्थिती अशी आहे की, ज्यांच्या आवाजाला लाखो चाहत्यांनी दाद दिली, त्या आवाजांमागचे शब्द देणारा गीतकार स्वतःच्या आयुष्याशी झुंज देत आहे. युरोपमध्ये जाहीर झालेल्या आयएमएफए पुरस्कारासाठी आर्थिक परिस्थितीमुळे मानवेल गायकवाड यांना स्वतः उपस्थित राहता आले नाही. अखेर त्यांचा पुरस्कार अभिनेता पंढरीनाथ कांबळे यांनी स्वीकारला. पुरस्काराची बातमी झाली; मात्र त्या पुरस्कारामागच्या गीतकाराच्या घरातील परिस्थिती किती बिकट आहे, याची दखल किती जणांनी घेतली, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

  • मी अनेक टॉपच्या गायकांना गाणी दिली, त्यांना मोठं केलं; पण माझ्यासारख्या पडद्यामागच्या कवीला आज आर्थिक टंचाई आणि घराच्या कमतरतेमुळे हलाखीचं जीवन जगावं लागतं,’ अशी खंत व्यक्त करताना मानवेल गायकवाड भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू केवळ एका कलाकाराची वेदना नव्हती, तर लोकप्रियतेच्या झगमगाटामागे उपेक्षित राहिलेल्या असंख्य पडद्यामागच्या कलाकारांच्या आयुष्याचा आरसा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT