शब्दांपलीकडचं साहित्य : कवी केशवसुत स्मारक pudhari photo
ठाणे

Marathi Bhasha Din Special : शब्दांपलीकडचं साहित्य : कवी केशवसुत स्मारक

अभिजात मराठी भाषा दिन विशेष : शब्दांपलीकडचं साहित्य : कवी केशवसुत स्मारक

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : आर्किटेक्ट संतोष तावडे

साहित्यविश्वात काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात की त्यांची ओळख केवळ त्यांच्या लिखाणापुरती मर्यादित राहत नाही. त्यांचं संपूर्ण आयुष्यच एक सांस्कृतिक समृद्धीचा अनुभव ठरतो. अशा व्यक्तींच्या शब्दांइतकीच त्यांची दृष्टी, संवेदना आणि मूल्यदृष्टीही समाजमन घडवत असते. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक हे अशाच विरळा साहित्यिकांपैकी एक. वयाच्या शहाण्णवाव्या वर्षीही त्यांचं आयुष्य म्हणजे साहित्याबरोबरच सर्जनशीलतेचाही एक अखंड प्रवास आहे. न थांबणारा, न थकणारा.

मालगुंड येथील विलोभनीय ‌‘कवी केशवसुत स्मारक‌’ हा त्या प्रवासातील एक ठोस आणि दृश्य साक्षात्कार आहे. हे कवी केशवसुतांचं केवळ स्मारक नसून मधुभाईंच्या साहित्यदृष्टीतून आकार घेतलेलं ते एक व्यापक सांस्कृतिक विधान आहे. म्हणूनच या स्मारकाची निर्मिती एक वैशिष्ट्यपूर्ण ‌‘साहित्यकृती‌’ वाटते. फरक एवढाच, की इथे मधुभाईंचं साहित्य शब्दांत न राहता अवकाशातून व्यक्त झालं आहे.

एक आर्किटेक्ट म्हणून या स्मारकाकडे पाहताना त्यात मला वास्तूपेक्षा साहित्याचीच संवेदना अधिक जाणवते. म्हणूनच प्रत्येकवेळी या स्मारकाच्या परिसरात पाऊल टाकताना केवळ वास्तुरचना पाहण्यापेक्षा ती अधिकाधिक अनुभवण्याचा माझा प्रयत्न असतो.

कवी केशवसुत स्मारकाच्या परिसरात प्रवेश करताच प्रथम आपल्याला एक मोकळी, खुली जागा लागते. त्यापुढे समोरच कविवर्यांचं जन्मघर दिसू लागतं आणि आपण नकळत घरासमोरील अंगणात अलगद पाऊल ठेवतो. कोकणातल्या प्रत्येक पारंपरिक घरासमोर जसं अंगण असतं, तसंच हे अंगण आहे. घर आणि बाहेरील जग यांच्यामधलं अत्यंत अर्थपूर्ण संक्रमण-अवकाश. कोणताही अतिरिक्त हस्तक्षेप न करता, कोकणी घरासमोरच्या अंगणाची पारंपरिक भूमिका इथे जाणीवपूर्वक जपलेली दिसते.

अंगणाला लागूनच केशवसुतांचं जन्मघर उभं आहे. प्रशस्त अंगणाने घराच्या साधेपणाला अधिक अधोरेखित केलं आहे. लालसर मातीच्या भिंती, कौलारू छप्पर आणि कोकणी घरांची साधी, जमिनीशी नातं सांगणारी ठेवण असलेलं हे घर. कवीवर्यांचं हे घर कोणताही दावा करत नाही, कोणतीही भव्यता मिरवत नाही. तरीही त्यासमोर उभं राहिल्यावर एक वेगळीच जाणीव होते, कारण इथे काही वर्षांपूर्वी एका संवेदनशील मनाने पहिला श्वास घेतला होता. त्यामुळेच स्मारकाची उभारणी करताना त्यांचं हे जन्मघर अत्यंत काळजीपूर्वक जतन करण्यात आलं आहे.

घराच्या मूळ रचनेला, कोकणी बाजाला आणि त्याच्या ऐतिहासिक स्वभावाला जराही धक्का न लावता आवश्यक ती दुरुस्ती करण्यात आली आहे. हे घर कुठेही लपवलेलं नाही आणि कुठे मिरवलेलंही नाही. जसं आहे तसंच, अत्यंत साधेपणानं उभं आहे. इथे कोणतीही अवडंबरपूर्ण पुनर्रचना नाही, कोणतीही सजावट नाही. ‌‘काहीतरी करण्याचा‌’ मोह कुणालाही झाला असता, पण तो मोह इथे जाणीवपूर्वक टाळण्यात आला आहे. त्यामुळेच हे घर आज एक विनम्र, शांत आणि स्थिर केंद्र म्हणून या स्मारक संकुलात उभं आहे.

कविवर्यांच्या जन्मघराच्या थोडं पुढे गेल्यावर मधल्या मोकळ्या जागेत एक लक्षवेधी शिल्प उभं आहे. स्टीलमध्ये साकारलेले हे शिल्प कवी केशवसुतांच्या अजरामर ‌‘तुतारी‌’ या कवितेवर आधारित आहे. ‌‘एक तुतारी द्या मज आणून‌’ या ओळींनी सुरू होणारी आणि मराठी साहित्यात जागृतीचा आवाज ठरलेली ही केशवसुतांची अजरामर कविता. तुतारी दोन्ही हातात धरून वाजवत उभा असलेला हा मनुष्य केवळ ती वाजवत नाही, तर जणू तो काळाला, समाजाला, माणसाच्या अंतःकरणाला हाक देतो आहे असं वाटतं. स्थिर असूनही हे शिल्प अत्यंत बोलकं आहे, त्यात एक तीव्र आवाहन आहे.

यानंतर आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचतो जिथे केशवसुतांची काही मोजकी काव्यशिल्पे एकत्रितपणे मांडलेली आहेत. ही चिरंतन काव्यशिल्पे नुसती ‌‘पाहायची‌’ नसून, थांबून, उभं राहून ती प्रत्यक्षात अनुभवायची आहेत. (क्रमशः)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT