Mango Tree Custard Apple:
भिवंडी: 'देवाची करणी आणि नारळात पाणी' ही म्हण आपण नेहमीच ऐकतो, पण निसर्गाच्या किमयेचा एक अजब चमत्कार भिवंडी तालुक्यात पाहायला मिळत आहे. येथे एका आंब्याच्या झाडाला चक्क सीताफळ लागले असून, हा दुर्मिळ चमत्कार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठी गर्दी करत आहेत.
भिवंडी-वाडा रस्त्यावरील दुगाड फाटा परिसरातील साईगाव अस्नोली येथे शेतकरी जयेश पटेल यांचे घर आहे. त्यांच्या अंगणात गेल्या आठ वर्षांपासून आंब्याचे एक झाड आहे. सध्या या झाडाला आंबे लागले आहेत. मात्र, २ मे रोजी या झाडाखाली खेळणाऱ्या मुलांना काहीतरी वेगळे दिसले. नीट पाहिल्यावर आंब्याच्या फांदीला सीताफळ लागल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मुलांनी ही बाब घरातील मोठ्या माणसांना सांगितली. सुरुवातीला कोणाचाही विश्वास बसला नाही, मात्र प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर कुटुंबीयही आश्चर्यचकीत झाले. या घटनेचा व्हिडिओ जितेंद्र भोईर यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला, सध्या तो प्रचंड व्हायरल होत आहे. एकाच झाडावर दोन वेगवेगळ्या प्रकारची फळे येणे हे वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने दुर्मिळ मानले जाते. यामुळेच हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी सध्या ग्रामस्थ गर्दी करत आहेत.