शहापूर : राजेश जागरे
ठाणे जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या आंबियाबहार फळपीक विमा योजना 2024/25 अंतर्गत विमा उतरवूनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषतः शहापूर व मुरबाड तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून ते नाराजी व्यक्त करतांना दिसत आहेत. या संदर्भात कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष किशोर कुडव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
आंबियाबहार फळपीक विमा योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विमा पुणे यांच्या माध्यमातून उतरविण्यात आला होता. शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक विमा हप्ता वेळेत भरला असूनही आजतागायत नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. मागील वर्षी जिल्ह्यात अचानक आलेली वादळे, अवकाळी पाऊस तसेच अपेक्षेपेक्षा लवकर सुरू झालेला पावसाळा यामुळे आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फुलधारणा व फळधारणा टप्प्यावरच पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे राज्यातील काही इतर जिल्ह्यांमध्ये याच विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील शहापूर व मुरबाड तालुक्यांतील शेतकऱ्यांना क्लेम न मिळाल्याने भेदभाव होत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
दरम्यान या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हा क्षेत्रीय अधिकारी तसेच जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, ठोस माहिती मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी कुणबी समजोन्नती संघाच्या निदर्शनास आणून दिले आहे. क्लेमची सद्यस्थिती, मंजुरी प्रक्रियेबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रम कायम आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी व समस्या सोडविण्यास सातत्याने कार्यरत असलेल्या कुणबी समजोन्नती संघाचे अध्यक्ष किशोर कुडव यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. शेतकऱ्यांची दयनीय आर्थिक अवस्था लक्षात घेता, संबंधित विमा कंपनीस तत्काळ नुकसान भरपाई अदा करण्याचे आदेश द्यावेत, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. विमा क्लेमवरच शेतकऱ्यांचे पुढील हंगामाचे नियोजन अवलंबून असल्याने प्रलंबित क्लेम वितरित करावेत, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा संघटनांकडून दिला जात आहे.
मागील वर्षी अनपेक्षित वादळ, अवकाळी पाऊस तसेच लवकर आलेल्या पावसाळ्यामुळे आंबा पिकापासून उत्पन्न मिळालेले नाही. तथापि बजाज अलायन्स कंपनी लि.पुणे यांच्या माध्यमातून विमा उतरवलेला आहे. त्यापोटी शेतकऱ्यांनी कंपनीकडे आवश्यक विमा हप्ता देखील मुदतीमध्ये भरणा केलेला आहे. मात्र आजतागायत शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा.किशोर कुडव, अध्यक्ष, कुणबी समाजोन्नती संघ