मांडा-टिटवाळ्यातील रस्त्याचा वाद उफाळला pudhari photo
ठाणे

Thane News : मांडा-टिटवाळ्यातील रस्त्याचा वाद उफाळला

वनविभागाकडून मुख्य रस्ता बंद केल्याने ग्रामस्थात असंतोष

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा : नवश्री सिद्धीविनायक व सह्याद्री को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीला जोडणारा, नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मुख्य रस्ता वनविभागाने बंद केल्याने सुमारे 400 हून अधिक कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे मांडा-टिटवाळा पूर्व भागातील विद्यामंदिर शाळेजवळील रस्त्याचा वाद पुन्हा एकदा उफाळला असून, वनविभागाने केलेल्या अचानक कारवाईमुळे परिसरात तीव्र असंतोष पसरला आहे.

वनविभागाच्या म्हणण्यानुसार, विद्यामंदिर शाळेजवळील तसेच मांडा परिसरातील काही जागा त्यांच्या अखत्यारित येतात. या भागात अनधिकृत बांधकामे वाढत असल्याचा दावा करत, वनजमिनीच्या संरक्षणासाठी हा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र स्थानिक नागरिकांच्या मते, हा रस्ता केवळ वाहतुकीचा मार्ग नसून संपूर्ण परिसराची ‌‘जीवनवाहिनी‌’ आहे.

याच रस्त्याने रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पाणीपुरवठ्याचे टँकर तसेच कचरा संकलनाची वाहने सोसायट्यांमध्ये प्रवेश करीत होती. रस्ता अचानक बंद झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत गंभीर परिणाम भोगावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. आजारपण, आग अथवा अन्य दुर्घटना घडल्यास मदत वेळेत पोहोचणार कशी, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी यापूर्वीच वनविभागाकडे लेखी निवेदन देत रस्ता पूर्णतः बंद न करता किमान वाहतुकीसाठी खुला ठेवावा, अशी मागणी केली आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई व्हावी, यास नागरिकांचा विरोध नसून, त्यासाठी सर्वसामान्यांचा मार्ग बंद करणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नियंत्रित स्वरूपात रस्ता खुला ठेवूनही कारवाई शक्य असल्याचा दावा रहिवाशांकडून केला जात आहे.

वाहनांना परवानगी देण्यास नकार

दरम्यान, वन अधिकारी निलेश आखाडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, सदर जागा वनविभागाच्या मालकीची असून वाहनांची ये-जा येथे शक्य नाही. नागरिकांच्या मागणीचा विचार करता केवळ पादचाऱ्यांसाठी पायवाट ठेवण्यात येईल, मात्र वाहनांना परवानगी दिली जाणार नसल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. या निर्णयामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, किमान आपत्कालीन सेवांसाठी तरी विशेष सवलत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. वनविभागाचा निर्णय आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामध्ये प्रशासन कोणता तोडगा काढते, याकडे मांडा-टिटवाळा परिसराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT