डोंबिवली: मनाचे आरोग्य आणि भावनांचे महत्त्व संगीताच्या माध्यमातून समजावून सांगणारा 'मन मंदिरा' हा अनोखा कार्यक्रम डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात नुकताच उत्साहात संपन्न झाला. 'मनोदय ट्रस्ट' आयोजित या सांगितिक कार्यक्रमाला डोंबिवलीतील उत्साही आणि दर्दी रसिकांनी तुडुंब गर्दी केली होती. निवडक हिंदी आणि मराठी गाण्यांच्या सादरीकरणातून भावना आणि विचारांचा अर्थ उलगडून सांगणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थित सर्व प्रेक्षकांची मने खऱ्या अर्थाने उजळून टाकली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते डॉ. अद्वैत पाध्ये यांचे निरूपण. त्यांनी 'एक धागा सुखाचा', 'मन मंदिरा', 'तोरा मन दर्पण', 'ये हौसला कैसे झुके', 'किसी की मुस्कुराहटोंपे' अशा जुन्या-नव्या गाण्यांची निवड करून त्यातील भावनिक अर्थ उलगडून सांगितला. डॉ. पाध्ये यांनी केवळ गाणी सादर केली नाहीत, तर गीतकारांच्या शब्दांचे आणि संगीतातील सूरांचे सखोल विश्लेषण करत मानवी भावनांच्या विकासाचे महत्त्व विशद केले. त्यांच्या निरूपणातून व्यक्त होणारा अर्थ उपस्थित श्रोत्यांच्या थेट हृदयाला भिडणारा होता.
डॉ. पाध्ये यांनी ग.दि. माडगूळकर (गदिमा), गुलजार, जावेद अख्तर यांसारख्या ज्येष्ठ गीतकारांपासून ते वरूण ग्रोव्हर आणि मंदार चोळकर यांसारख्या नवोदित गीतकारांच्या शब्दांतील भावना आणि त्यांचा मानसिक आरोग्याशी असलेला संबंध प्रभावीपणे समजावून सांगितला. त्याचबरोबर, भारतीय शास्त्रीय संगीतातील सूर आणि पाश्चात्त्य संगीताचे कॉर्ड्स यातून व्यक्त होणाऱ्या भावभावनांचे विश्लेषणही त्यांनी केले. निरूपण करताना डॉ. पाध्ये यांनी स्वतः रचलेल्या अभंगाला डोंबिवलीकर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
ज्येष्ठ संगीत संयोजक उदय चितळे यांच्या उत्कृष्ट वाद्यवृंदाने या कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कॅसिओवर अभिषेक जहागीरदार, ऑक्टोपॅडवर रोहन मोकल, तर तबला/ढोलकवर अनिल खैरनार यांनी अप्रतिम साथ दिली. या कलाकारांसह रोहित पाध्ये, गौरव केळकर, प्रथमेश जोशी, अपूर्वा चितळे, सायली खेर-परांजपे, आणि गायत्री महाबळेश्वरकर या गायकांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली. या गायकांपैकी काही जण शास्त्रीय आणि सुगम संगीताचे विशारद असल्याने गाण्यांचे सादरीकरण अधिक प्रभावी झाले. सह-निवेदक म्हणून प्रथमेश जोशींनी केलेले निवेदनही उत्कृष्ट होते.
'मन मंदिरा' हा कार्यक्रम उपस्थित सर्वांसाठी केवळ मनोरंजन नव्हता, तर ते आत्मपरीक्षणाचे आणि मानसिक आरोग्याबद्दलच्या जागरूकतेचे एक सुंदर माध्यम होते. या कार्यक्रमात मनोदय ट्रस्टचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाणी ऐकल्यानंतर आणि निरूपणानंतर, रसिक प्रेक्षकांनी 'आम्हाला गाण्यांकडे आणि जीवनातील भावनांकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली,' असा अभिप्राय नोंदवत कार्यक्रम आयोजकांचे आभार मानले.