

डोंबिवली: पश्चिम डोंबिवलीतील वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या डोंबिवलीकरांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. मोठागाव-माणकोली उड्डाणपुलाशी जोडलेल्या दिवा-वसई रेल्वे मार्गावरील रेतीबंदर रोडवर असलेल्या मोठागाव रेल्वे फाटकावर चार पदरी उड्डाण पूल बांधण्यास रेल्वे प्रशासनाने अखेर मंजुरी दिली आहे. यामुळे या फाटकावर होणारी मोठी वाहतूक कोंडी आणि खोळंबा या त्रासातून डोंबिवलीकरांना लवकरच कायमचा आराम मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 168 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
मोठागाव-माणकोली उड्डाणपुलामुळे मुंबई-ठाणे तसेच मुंब्रा, नवी मुंबई आणि पनवेलकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ या रस्त्यावर वाढली आहे. ही सर्व वाहने रेतीबंदर रोडवरील मोठागाव फाटकाजवळ आल्यावर लांब पल्ल्याच्या मेल/एक्सप्रेस गाड्या आणि मालगाड्या जाईपर्यंत दुतर्फा अडकून पडत होती, ज्यामुळे मोठागाव रेल्वे फाटक डोंबिवलीकरांसाठी मोठी डोकेदुखी बनले होते. या फाटकावरील उड्डाणपुलाची तातडीची गरज लक्षात घेऊन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती.
या मागणीला अनुसरून शासनाने 168 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून पुलाच्या बांधकामासोबतच भूसंपादनासह पोहोच रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पात बाधित होणाऱ्या 600 रहिवाशांच्या पुनर्विकासाचा मार्गही मोकळा झाला आहे. या निधीपैकी 30 कोटी रुपये भूसंपादनासाठी, तर बाधितांच्या पुनर्विकासासाठी 138 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर झालेल्या या शासकीय निधीला प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी केडीएमसीने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे तातडीने मागणी केली आहे.
या महत्त्वाच्या कामासाठी केडीएमसी प्रशासनाने मागील दोन वर्षांपासून सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता, पण त्याला अपेक्षित दाद मिळत नव्हती. अखेर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासन आणि शासनाकडे या प्रकल्पासाठी जोरदार तगादा लावला. मोठागाव-माणकोली पुलावरील प्रचंड ताण लक्षात घेऊन मोठागाव रेल्वे फाटकावर दोनऐवजी चार पदरी उड्डाण पूल बांधण्याच्या आराखड्याला मंजुरी मिळवण्यात त्यांच्या दोन वर्षांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
या प्रकल्पांतर्गत 24 मीटर रस्त्याच्या भूसंपादनासाठी 72 कोटी 75 लाख, पुलाच्या बांधकामासाठी 5 कोटी 58 लाख, पोहोच रस्त्यांसाठी 84 कोटी आणि देवीचा पाड्यातील चकाचक मंदिराजवळ पुश-थ्रू बोगद्यासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 600 बाधितांना 86 कोटी रुपयांची भरपाई दिली जाईल. पुलाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा सुरू राहील, असे दिपेश म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. हा पूल पूर्ण झाल्यास डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर होईल.