डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साडी नेसलेला फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याबद्दल काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत भर रस्त्यात काँग्रेसचे 72 वर्षीय निष्ठावान कार्यकर्ते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शालू नेसवून मामा पगारे यांची बदनामी केली होती. मामा पगारे यांनी या प्रकरणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र हा गुन्हा टिळकनगर पोलिसांनी दाखल करून न घेतल्याने त्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली कल्याणच्या पोलिस उपायुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उपस्थित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी खांद्यावर घेऊन मामा पगारे यांचा सन्मान केला. हा नजारा पाहणारे सारेच अवाक् झाले होते.
कार्यक्रमस्थळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचे आगमन होताच त्यांचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत स्वागत केले. आपल्या निष्ठावान आणि सच्च्यावर कार्यकर्त्याची भाजपा पदाधिकाऱ्यांनी बदनामी केली आहे, त्याचा निषेध म्हणून सामान्य कार्यकर्ता जरी असले तरी वयाने ज्येष्ठ असलेल्या मामा पगारे यांना प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांनी व्यासपिठाजवळ अलगद उचलून खांद्यावर घेतले. प्रदेशाध्यक्षांची ही कृती पाहून उपस्थित सर्वच काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आवाक् झाले होते.
राहूल गांधींकडून दखल
साडी नेसविण्याच्या प्रकारानंतर भाजपाची सर्वत्र निंदा होत असतानाच मामा पगारे यांची प्रकृती खालावली आणि त्यांना उपचारासाठी रूग्णालयातही दाखल करण्यात आले. काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मामा तुम्ही घाबरू नका, काँग्रेस तुमच्या सोबत आहे. आम्हाला तुमच्याबद्दल बाळासाहेब थोरातांनी माहिती दिली. 50 वर्षांपासून तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात. तुमचा खूप आदर आहे, अशा शब्दांत राहूल गांधींनी मामा पगारे यांना धीर दिला.