मुरबाड शहर/टोकावडे : माळशेज घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या मोरोशी आश्रम शाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गुरुवारी पहाटेच्या सुमारास वसतीगृहातच गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. यामुळे आश्रम शाळेतील विद्यार्थांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मोरोशी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अंतर्गत येणाऱ्या मुरबाड तालुक्यातील दुर्गम व निसर्गरम्य अशा माळशेज घाटाच्या पायथ्याजवळ मोरोशी येथे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक पहिले ते बारावीपर्यंत शासकीय आश्रम शाळा आहे. या शाळेत एकूण विद्यार्थी संख्या 405 आहे. यात मुलांची संख्या 181 तर मुलींची संख्या 224 इतकी आहे. यापैकी 73 मुली व 30 मुले आश्रम शाळेच्या वसतिगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. मुलींचे वसतिगृहाचे दोन रूम असून दोन रूममध्ये 32 मुली राहात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र या विद्यार्थिनीने कोणत्या कारणास्तव आपली जीवनयात्रा संपवली, याचे कारण मात्र गुलदस्त्याच आहे.
मुरबाड तालुक्यातील आदिवासी विद्यार्थांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अंतर्गत मोठ्या प्रमाणात शासकीय आश्रमशाळांची उभारणी केली आहे. यात माळ, मोरोशी, वाल्हिवरे, मढ, आदी ठिकाणी शासकीय आश्रमशाळा असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. टोकावडेपासून ते माळशेज घाटाच्या पायथ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहत असल्याने तेथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी येथे शाळांची उभारणी केली आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जीवन संपवण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत असल्याचे दिसत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील वर्षी देखील येथील एका आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याने जीवन संपवले होते. तर दुसऱ्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा आजाराने मृत्यू झाला होता. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळेतीलच विद्यार्थी जीवन का संपवतात? याचा शोध वरिष्ठ पातळीवर घेणे गरजेचे आहे.
सदर घटनेचा पंचनामा टोकावडे पोलिसांनी केला असून मुलीचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी टोकावडे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, नातेवाईक, पत्रकार, प्रकल्प अधिकारी, तसेच विविध सामाजिक व आदिवासी संघटनांचे पदाधिकारी शाळेत दाखल झाले. घटनेमुळे पालक व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या प्रकरणी प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे यांनी आदिवासी प्रकल्प विभागाचे ठाणे येथील अप्पर आयुक्त यांना पत्र सादर केले आहे. त्यानुसार, संबंधित मुख्याध्यापक, अधीक्षकांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली.