ठाणे: बेफाम वेग, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक आणि प्रशासनाची उघडीपणे चाललेली डोळेझाक यामुळे भीषण अपघातात तब्बल 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून संतापाची लाट उसळली आहे. दररोज हजारो कामगार व प्रवासी माळशेज घाटाच्या पायथ्यापासून मुंबईकडे जीव मुठीत धरून प्रवास करतात. मात्र त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? मुरबाडहून धावणाऱ्या खासगी इको गाड्या अक्षरशः मृत्यूचे सापळे ठरत आहेत.
क्षमतेपेक्षा दुप्पट-तिप्पट प्रवासी कोंबून ही वाहने रस्त्यावर धावत आहेत. माणसं नव्हे, जनावरांसारखी कोंबली जात आहेत! प्रश्न एकच आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार? नियम फक्त कागदावरच राहणार का? आणि सामान्य नागरिकांचा जीव इतका स्वस्त आहे का? आता तरी कठोर कारवाई होणार का, की पुढच्या अपघाताची वाट पाहायची?
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील उल्हास नदीवरील रायते येथील नव्या पुलावर सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडून 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही सर्व बेकायदेशीर वाहतूक उघडपणे सुरू असतानाही आरटीओ आणि पोलीस यंत्रणा गप्प का? स्थानिकांमध्ये उघडपणे चर्चा आहे की महिन्याला “हप्ते” दिले जात असल्यामुळेच या वाहनांवर कोणतेही नियंत्रण नाही.
जर हे खरे असेल, तर हा अपघात नसून सरळसरळ व्यवस्थेचा खून आहे! त्यातच नव्याने बनवलेला गुळगुळीत सिमेंट काँक्रीट रस्ताजो सुरक्षिततेसाठी असायला हवा होतातोच आता वेगाची शर्यंत बनला आहे. स्पीड लिमिटची पायमल्ली होत असून चालक बेधुंद वेगात गाड्या चालवत आहेत. परिणामी, मागील दोन दिवसांत अपघातांची मालिका सुरू झाली आहे. या अपघातामागे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सध्या या पुलावर एकाच बाजूने वाहतूक सुरू असून त्याच मार्गावरून दोन्ही बाजूंनी वाहने ये-जा करत आहेत. मात्र, कोणतेही सूचना फलक, दिशादर्शक चिन्ह किंवा वेगमर्यादा दर्शविणारे बोर्ड नसल्याने वाहनचालकांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी कर्मचारीही नियुक्त नसल्याने हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. कल्याण - मुरबाड महामार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना योग्य सुरक्षा उपाययोजना न केल्याचा आरोप कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित यंत्रणांवर होत आहे.
एसटीअभावी इच्छा नसतानाही आधार घ्यावा लागतोय ‘काळी पिवळी’चा
1) खासगी गाड्यांमधून जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची इच्छा नसतानाही अपुऱ्या बससेवेअभावी प्रवाशांना नाईलाजाने हा पर्याय स्वीकारावा लागत असल्याची तीव्र खंत व्यक्त केली जात आहे. “बसच उपलब्ध नसल्याने खासगी गाड्यांकडे वळावे लागते आणि त्यातूनच असे अपघात घडतात,” अशी भावना प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे.
कल्याण डेपोमध्ये मुरबाडच्या प्रवाशांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारीही सातत्याने पुढे येत आहेत. लांब पल्ल्याच्या बसमधील चालक व वाहकांकडून मुरबाडच्या प्रवाशांशी अनेकदा असभ्य वर्तन केले जात असल्याचे प्रवासी सांगतात. या सर्व प्रकारांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी असून, सन्मानपूर्वक व सुरक्षित प्रवासाचा हक्क मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.
2) आमदार किसन कथोरे यांनी मुरबाडसाठी सहा बसेस उपलब्ध करून दिल्यानंतर कल्याण-मुरबाड प्रवाशांचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र उद्घाटनानंतर या बसेस प्रत्यक्ष सेवेत दिसत नसल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. परिणामी, प्रवाशांना पुन्हा खासगी आणि धोकादायक वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर खासगी प्रवासी गाड्यांवर तात्काळ नियंत्रण आणून आवश्यकतेनुसार नियमित बस सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. विशेषतः रात्री उशिरापर्यंत कल्याण येथे ताटकळत उभे राहणाऱ्या प्रवाशांसाठी कल्याणहून मुरबाडकडे पुरेशा बसेस उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नियमांचे उघड उल्लंघन: मुळात या खासगी प्रवासी गाड्यांना आरटीओने नेमक्या कोणत्या निकषांवर परवानगी दिली, असा गंभीर सवाल उपस्थित केला जात आहे. या मार्गावर दिवसेंदिवस जीवघेणी वाहतूक सुरू असताना कल्याण-मुरबाड दरम्यान असलेल्या पोलीस चौक्यांकडून ठोस कारवाई का होत नाही? हाही प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. नियमांचे उघड उल्लंघन होत असतानाही संबंधित यंत्रणा निष्क्रिय का? असा रोष व्यक्त होत आहे. “कारवाई केवळ सामान्य नागरिकांवरच होते, मात्र अशा धोकादायक प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जाते,” अशा तक्रारी चालक आणि प्रवाशांकडून सातत्याने पुढे येत आहेत.
अपघातानंतर तातडीने पुलाची मार्गीका खुली: अपघातापूर्वी संबंधित पूल केवळ एका बाजूनेच वाहतुकीसाठी खुला होता आणि त्याच मार्गावरून दोन्ही दिशेची वाहने सुरू होती. मात्र भीषण अपघातानंतर लगेचच कल्याणकडे जाणारा दुसरा पूलही तातडीने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे हा पूल यापूर्वी कोणत्या कारणासाठी रोखून ठेवण्यात आला होता, तो उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. जर हा पूल आधीच पूर्ण क्षमतेने सुरू केला असता, तर वाहतुकीवरील ताण कमी होऊन अपघात टाळता आला असता, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. ठेकेदार व संबंधित प्रशासनाने आवश्यक निर्णय वेळेत घेतले असते तर ही दुर्घटना टाळता आली असती का? याबाबतही तीव्र चर्चा सुरू आहे.
उद्या परत तेच ! पर्याय नसल्याने जीव धोक्यात घालून प्रवास!!: भीषण घटनेने मुरबाड तालुका अक्षरशः सुन्न झाला असून संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. प्रत्येकाच्या मनात हळहळ आणि असहाय्यतेची भावना आहे. मात्र या दुर्दैवी वास्तवातही कटू सत्य असेच आहे की, उद्या पुन्हा चाकरमानी, विद्यार्थी आणि गरजू प्रवासी नाईलाजाने याच खासगी इको गाड्यांमध्ये प्रवास करताना दिसतील. त्यावेळी आश्चर्य वाटायला नको, कारण पर्याय नसल्याने जीव धोक्यात घालूनही प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे, आणि हीच परिस्थिती या व्यवस्थेतील गंभीर अपयश अधोरेखित करते.