ठाणे

Thane News : ठाणे-बोरीवली बोगद्याला जोड रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करा

मुल्लाबाग परिसरातील रहिवाशांच्या लढ्यात जितेंद्र आव्हाड यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

विकासाला कधीच कुणी विरोध करीत नाही. पण, विकास करताना अमर्याद वृक्षतोड करून धुळीचे साम्राज्य निर्माण केले जात असेल अन् त्यातून नागरिकांना फुफ्फसाचे आजार जडणार असतील तर करायचे काय? शांततेसाठी घर घेणाऱ्यांच्या नशिबी गाड्यांच्या आवाजाचा कोलाहल वेणार असेल तर नागरिकांना मानसिक धक्का बसणारच ना, त्यामुळे ठाणे-बोरीवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करावा, अशी नागरिकांसह आपली मागणी आहे.

त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह एमएमआरडीएशी झगडण्यास तयार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

राज्य सरकारचा अंत्यत चहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणे-बोरीवली भुयारी मार्गाविरोधात नुकतेच मुल्लाबाग येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. ठाणे शहरातून बोरीवली १५ मिनीटांत गाठण्यासाठी एमएमआरडीएकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जात आहे.

परंतु भुयारी मार्ग तयार करण्यापूर्वी एमएमआरडीएने वा भागातील अनेक वृक्ष तोडले आहेत. या मार्गाच्या कामामुळे धूळ प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुन्हाड चालविण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता. धूळ प्रद्यणामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे रहिवाशांनी सांगितले. हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्याऐवजी मुल्लाबाग येथून चुनी अपेक्स पर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. मात्र, त्यावर निर्णय न झाल्याने आपल्या लढ्याचे नेतृत्व डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी करावे, अशी विनंती करीत स्थानिक नागरिकांकडून कॉसमॉस लॉज क्लब हाऊसमध्ये एका बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीस जितेंद्र आव्हाड हे संबोधित करीत होते. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मानपाडा भागात लगतचा मुल्लाबाग परिसर निसगनि नटलेला आहे. एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डोंगर आणि दुसरीकडे अनेक वर्ष जुन्या वृक्षांची हिरवळ यामुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागात वातावरणमध्ये नेहमी गारवा असतो. येथील निसर्गसंपदा पाहून अनेकांनी या भागात गृहखरेदी केली. आता त्यांना मानसिक धक्का बसला आहे. दररोज येथून पन्नास हजार गाड्या जाणार असतील तर वाढणारे प्रदुषण आणि श्वसनाचे विकार नागरिकांनी का सहन करायचे? मी रस्त्यावर उतरून लढणारा माणूस आहे. आता लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे निकाल पटकन लागणार आहे. तसे पाहता, हा छोटा प्रश्न आहे. पण, तो सोडविण्याची सरकारची मानसिकता हवीय. हा लढा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत नेणार आहे. हा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करावा, यासाठी मी आग्रह धरणार आहे.

ठाणे-बोरीवली बोगद्याच्या भुयारी मार्गाला विरोध नाही, परंतु हा बोगदा मुल्लाबाग येथे संपणार आहे. त्यामुळे पुढील मार्ग हा भूतल होत आहे. हा मार्ग पूर्णपणे भूमिगत व्हावा अशी मागणी येथील रहिवाशांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर मांडली. यावेळी रहिवाशांच्या वतीने उमेश अग्रवाल, नितीन सिंह, पंकज ताम्हाणे, पल्लवी शेठ, मधुरेश सिंह, दिपक पांडे, स्टीव्ह थॉमस, विवेक जव्हारकर, रचना वैद्य आदींनी आपली कैफियत मांडली.

नागरिकांना रस्ता ओलांडणे अशक्य

दरम्यान, बोगद्याला जोडणारा हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्यात येणार असून येथे टोल नाका ही उभारण्यात येणार आहे. त्याचा त्रास येथील गृहसंकुलतील नागरिकांना सहन करावा लागणार आहे. या मार्गाच्या कामामुळे येथून डम्परद्वारे मातीची वाहतूक केली जात असून दररोज शेकडो ट्रक येथून वाहतुक करतात. यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे शक्य होत नाही. या वाहतुकीमुळे धूळ प्रदूषण, वाहतूककोंडी वाढली आहे. त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुन्हाड चालविण्यात येत आहे. यामुळे येथील हरित पट्टा नष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT