

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात विशेषतः कल्याण तालुक्यातील अनेक शेतकरी व भूमीपुत्रांच्या जमिनींचे घोटाळे शनिवारी (दि.7) डोंबिवलीत पार पडलेल्या बैठकीच्या माध्यमातून चव्हाट्यावर आले आहेत. जमिनींच्या बाबतीत सुरू असलेल्या दिवाणी स्वरूपाच्या न्यायप्रक्रियेला देखील (फाट्यावर मारून) बगल देऊन काही कथित बांधकाम व्यावसायिकांनी गुंडांचा वापर करून जमिनी हडपण्यासाठी गुंडांचा वापर सुरू केला आहे.
जमिनी बळकावणाऱ्या बिल्डरांविरोधात या गंभीर प्रकाराविरोधात भूमीपुत्रांनी आता एकजूट केली आहे. एकीकडे आंदोलनाची भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे जमिनी बळकावणाऱ्या बिल्डरांच्या विरोधात भूमिपुत्रांनी फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात डोंबिवलीतील श्रीक्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिरात बैठक पार पडली.
स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी हडपण्यासाठी गुन्हेगार प्रवृत्तीच्या परप्रांतीय बिल्डरांनी गुंडांचा वापर सुरू केला आहे. शिवाय अशा कथित बिल्डरांनी त्यांच्या गावांकडील महिलांच्या टोळ्या आणल्या आहेत. गुंड आणि महिलांच्या टोळ्यांनी गावोगावी उन्माद माजवला आहे. जमिनी हडपण्यासाठी गावांत घुसून भूमिपुत्रांवर हल्ले सुरू केले आहेत. अशा उन्मत्त बिल्डरांविरोधात भूमिपुत्रांनी बाह्या सावरल्या आहेत. अशा बदमाश टोळ्यांचा सफाया करण्यासाठी भूमिपुत्रांची एकजूट होणे अपेक्षित असल्याने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जबरदस्तीने जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिल्डरांच्याविरोधात फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला गोळवलीचे पिडीत शेतकरी बळीराम म्हात्रे, खंबाळपाड्याचे युवराज साळवी, डोंबिवलीचे अशोक म्हात्रे, देसाई गावचे रवी म्हात्रे, धनाजी शेलार, खिडकाळीचे यशवंत पाटील, नवनाथ पवार, आजदे गावचे सत्यवान म्हात्रे, यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व कायदेतज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर बैठकीला उपस्थित शेतकरी आणि भूमिपुत्रांना संबोधित करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण ग्रामीण अध्यक्ष मधुकर माळी, १४ गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर, उपाध्यक्ष कॉम्रेड पद्माकर पाटील, आंबेडकरी जनहित संघटनेचे प्रमुख संदीप गजघाट, सामाजिक कार्यकर्ते मारूती गायकर, प्रेमनाथ पाटील, महेंद्र पाटील, राम म्हात्रे, शशिकांत पाटील, जगदीश पाटील, कायदेतज्ञ कायदेतज्ञ ॲड. शशिकांत पाटील, हभप हनुमान महाराज पाटील उपस्थित होते.
कल्याण-डोंबिवलीला जोडून असलेल्या २७ गावांमध्ये लहान-मोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत/राहत आहेत. अनेक कथित बिल्डर शासन/प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता मनाला वाट्टेल तशा टोलेजंग इमारती उभारत आहेत. अशा बेकायदा इमारतींतील घरे आणि व्यापारी गाळे परस्पर विकून हेच कथित बिल्डर पसार होतात आणि खापर मात्र ज्यांची जागा/जमीन हडपली जाते त्यांच्यावरच फुटते. मात्र मॅन, मनी आणि मसल पॉवरचा वापर करणाऱ्या अशा कथित बिल्डरांच्या गुंडगिरी विरोधात भूमिपुत्रांच्या कोणत्याही तक्रारी पोलिस नोंदवून घेत नाहीत. उलट हेच पोलिस एकीकडे बिल्डरांना संरक्षण देत आहेत, तर दुसरीकडे तक्रारदार भूमिपुत्रांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे आता कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. कायद्याचा आधार घेऊन जमीनधारकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा निर्धार बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान करण्यात आला.
न्यायालयीन प्रक्रियेला बगल देत काही बिल्डर गुंडगिरीच्या माध्यमातून शेतजमिनींवर अतिक्रमणे करत आहेत. गुंडांच्या टोळ्या गावात घुसून पोलिसांच्या समक्ष भूमिपुत्रांवर हल्ले करत आहेत. जोर जबरदस्तीने जमीनींचा कब्जा घेत आहेत. भूमिपुत्रांच्या अशिक्षीत व अज्ञानाचा फायदा घेऊन जमिनींचे अर्धवट व बेकायदेशीर व्यवहार करून, फसवून जमिनी बळकाल्या जात आहेत. हे लक्षात घेता पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. यासाठी सर्व पिडीत भूमिपुत्र शेतकरी ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना भेटून फौजदारी कारवाईची मागणी करणार असल्याचे लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी सांगितले.