Major traffic jam on Kalyan-Shil road
नेवाळी : पुढारी वृत्तसेवा
कल्याण शिळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत असून रविवारी सकाळपासून या मार्गावर वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
हे नित्याचे चित्र असून पलावा जंक्शन ते मानपाडा जंक्शनपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे. सकाळ संध्याकाळ या परिसरात निर्माण होणार्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णवाहिका देखील तासन्तास ताटकळत अडकून राहत असल्याने नागरिकांकडून सत्ताधार्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र कोंडीमुक्त मार्गासाठी कोणत्याही उपायोजना दिसून येत नाहीत.
कल्याण शिळ रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढल्याने वाहनचालक हैराण आहेत. कामावर जाताना लेटमार्क घरी येताना उशीर यामुळे वाहनचालकांचा प्रवास त्रासदायक झाला आहे. त्यातच मेट्रो 12च्या कामासाठी जागोजागी कल्याण शिळ रस्त्यावरील दोन लेन ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे सतत मानपाडा, सोनारपाडा, दावडी नाका या परिसरात सर्वाधिक कोंडी होते. ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरू असतात. मात्र वाढती वाहन संख्या, अरुंद रस्ता याचा फटका सर्वसामान्य वाहनचालकांना बसू लागला आहे.
कल्याण शिळ रस्त्यावर सुरू असलेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकांचा प्रमाण अधिक आहे. रुग्णवाहिकेतून रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाताना महाबलाढ्य वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. मात्र कोंडी मुक्त मार्गासाठी कोणत्याही उपायोजना दिसून येत नसल्याने या रस्त्यावरील कोंडीमुक्त प्रवासाची अपेक्षा मात्र धूसर झालेली आहे.
कल्याण शिळ रस्त्यावरील माणगाव जवळ खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आधीच कोंडी त्यात खड्ड्यांची भरती त्यामुळे वाहतूक सतत धीम्या गतीने सुरू झाली आहे.