Tempo Overturn Traffic Jam Pudhari
ठाणे

Tempo Overturn Traffic Jam: डोंबिवली-अंबरनाथ महामार्गावर टेम्पो पलटी

नेवाळी नाका परिसरात टेम्पो उलटल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुढारी वृत्तसेवा

कसारा: डोंबिवली पाईपलाईन-अंबरनाथ महामार्गावर मंगळवारी पहाटे भीषण अपघात घडल्याने सकाळच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली. खोणी फाट्याकडून भरधाव येणाऱ्या टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने नेवाळी नाका ते डावलपाडा दरम्यान टेम्पो पलटी झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली. यावेळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

सकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला. टेम्पो अचानक पलटी झाल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बदलापूरकडून येणारी वाहतूक तसेच काटई नाका बाजूकडील वाहने जवळपास दहा किलोमीटरपर्यंत अडकून पडली होती. कामावर जाणाऱ्या कामगार वर्गाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

अपघाताची माहिती मिळताच हिल लाईन पोलीस तसेच विठ्ठलवाडी वाहतूक शाखेचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत पलटी झालेला टेम्पो बाजूला करण्याचे काम हाती घेतले होते.

सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी दहाच्या सुमारास वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी तसेच पोलिसांनी दिली आहे. मात्र, महामार्गावर दिवस-रात्र वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

महामार्गाच्या कोंडीवर उपाययोजनांची मागणी

या मार्गावर सततची वेगवान वाहतूक, अपुरी नियंत्रण यंत्रणा आणि वाढते अपघात यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने यापुढे अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या मार्गावर सततचे होणारे अपघात आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT