Kalyan District Court  Pudhari
ठाणे

Kalyan District Court | कल्याण जिल्हा न्यायालयात मोठे फेरबदल: एनडीपीएससह महत्वाची प्रकरणे आता ताम्हेणकर न्यायालयात

जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांच्याकडून आदेश पारित

पुढारी वृत्तसेवा

Kalyan District Court Cases Transfer

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालयातील हिंसाचार प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे अटकेत आहेत. त्यांच्या जामीन प्रकरणी चर्चेत आलेल्या कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी मोठे फेरबदल केले आहेत. प्रशासकीय कारणास्तव हे बदल करण्यात आले आहेत.

या संदर्भात ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी या पार्श्वभूमीवर २० जुलै रोजी आदेश पारित केले आहेत. या आदेशांनुसार, कल्याण येथील जिल्हा न्यायाधीश १ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती पी. एफ. सय्यद यांच्या समोरील सर्व महत्वाचे दावे, जामीन प्रकरणे, अंमली पदार्थ तस्करीतील दावे यापुढे याच न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश वर्ग २ तथा अपर जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. ताम्हेणकर यांच्या समोर चालणार आहेत.

ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने मे २०२६ च्या दोन आदेशान्वये आणि संदर्भाने प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने हे बदल करण्यात आल्याचे ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी आपल्या सोमवारी २० जुलै रोजी दिलेल्या आदेशांत म्हटले आहे.

श्रीमती पी. एफ. सय्यद यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेली सर्व विशेष प्रकरणे, जामीन अर्ज आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत असलेले विविध फौजदारी खटले जिल्हा न्यायाधीश २ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हेणकर यांच्या न्यायालयात कायद्यानुसार निकालासाठी वर्ग करण्यात आली आहेत. तसेच यापुढील काळात भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ४८२ आणि ४८३ नुसार दाखल होणारे सर्व फौजदारी जामीन अर्ज, गुन्ह्यांसंबंधित विविध अर्ज आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत नव्याने दाखल होणारी आरोपपत्रे यांची सुनावणी देखील जिल्हा न्यायाधीश २ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हेणकर यांच्याकडे पुढील आदेशांपर्यंत केली जाईल, असे आदेशात नमूद आहे.

ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या २८ आणि २९ मे २०२६ या दोन तारखांना दिलेल्या आदेशान्वये आणि संदर्भाने प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने हे बदल करण्यात आल्याचे ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी आपल्या सोमवारी २० जुलै रोजी दिलेल्या आदेशांत म्हटले आहे. याच सोबतच संबंधित सर्व प्रकरणे एकाच न्यायालयात पाठवली जावीत. ती वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये विभागली जाऊ नयेत, याची सर्व संबंधितांनी काळजी घ्यावी, अशीही सूचना मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी केली आहे. हा आदेश प्रशासकीय कारणास्तव आणि तात्काळ अंमलबजावणीसाठी दिला असल्याचे आदेशात म्हटले आहे.

या आदेशाची कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील वकिलांमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे. न्यायालयीन अधिकारी याविषयी अधिक भाष्य करण्यास तयार नाहीत. उल्लेखनीय बाब म्हणजे, डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रूग्णालयातील हिंसाचार प्रकरणी अटकेत असले नगरसेवक रमेश म्हात्रे यांचे जामीन प्रकरण देखील याच न्यायालयात होते. या प्रकरणामुळे रूग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर झालेले हे प्रशासकीय बदल चर्चेचा विषय बनले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT