Thane diesel smuggling Pudhari
ठाणे

Thane diesel smuggling: खाद्य तेलाच्या नावाखाली अवैद्य इंधन वाहतूक

ठाणे गुन्हे शाखा आणि शिधावाटप विभागाची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

ठाणे/ डोंबिवली: खाद्य तेलाच्या नावाखाली अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर ठाणे गुन्हे शाखा आणि शिधावाटप विभागाने धडक कारवाई करण्यात आली आहे. खारेगांव टोलनाका आणि कासरा अशा दोन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 54 हजार लिटर डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थसह 87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 10 आरोपींच्या विरोधात विविध ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा बाह्य वळण रस्त्याजवळ सापळा रचून संशयित टँकर थांबवण्यात आला. टँकरवर ‌‘एडिबल ऑईल‌’ असे लिहून लोकांची दिशाभूल करण्यात आली होती.

तपासणीदरम्यान टँकरच्या पाच कप्प्यांमध्ये 29 हजार लिटर डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थ आढळून आला. चालकाकडे कोणतेही वैध परवाने, देखरेख अथवा वाहतूक कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत 24 लाख 50 हजार रुपये किमतीचे इंधन आणि 22 लाख रुपये किमतीचा टँकर असा एकूण 46 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात आरोपींनी विरार खाडी परिसरातून बोटीमार्फत डिझेल आणून ते नाशिकच्या दिशेने वाहतूक करण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी चालक धर्मेंद्रकुमार श्यामलाल पटेल याला अटक करण्यात आली असून टँकर मालकासह आणखी सात साथीदारांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केडीएमटीच्या नावाने डिझेलचा झोल चव्हाट्यावर

शुक्रवारी दुपारच्या सुमारास कल्याणच्या भोईरवाडी येथील एका पेट्रोल पंपावर 800 लिटर क्षमतेचे 4 मोठे प्लास्टिक कॅन एका पिक-अप टेम्पोमध्ये भरले जात होते. एकूण 3200 लिटर डिझेलची वाहतूक होत असल्याने तिथे उपस्थित नागरिकांना संशय आला.

नागरिकांनी सदर टेम्पोच्या चालकाला हटकले असता, त्याने हे डिझेल केडीएमसीचे आहे, महापालिकेच्या कामासाठी नेत आहोत, असे उत्तर दिले. पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकानेही केडीएमसीच्या गाड्यांसाठी डिझेल दिल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ जागरूक नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रित करून तो समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे.

केडीएमटीचा स्पष्ट नकार : आमचा संबंध नाही

या प्रकरणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि केडीएमटी प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांनी त्या डिझेलशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. केडीएमटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, केडीएमटीच्या सर्व बसेससाठी आमचे कल्याण व डोंबिवली येथे स्वतंत्र डिझेल पंप आहेत.

आम्ही बाहेरील कोणत्याही खासगी पंपावरून डिझेल खरेदी करत नाही. त्यामुळे केडीएमसीच्या नावाने डिझेल नेले जात असेल, तर तो पूर्णपणे बेकायदा प्रकार आहे. केडीएमसीच्या यांत्रिकी विभागानेही बाहेरून डिझेल खरेदीची कोणतीही निविदा सध्या सुरू नसल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT