कोल्हापूर : फरार महेश आहेर याला गुरुवारी पहाटे कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. सोबत सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि त्यांचे सहकारी.  pudhari photo
ठाणे

Thane Crime : ठाण्याचा माजी सहायक आयुक्त महेश आहेरला कोल्हापूर पोलिसांनी केली अटक

लैंगिक अत्याचारप्रकरणी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महापालिकेचा माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता. अखेर गुरुवारी पहाटे त्याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने नरंदे (ता. हातकणंगले)येथून अटक केली. याबाबत माहिती मिळताच त्याचा ताबा घेण्यासाठी ठाणे शहर पोलिसांचे पथक कोल्हापूर येथे रवाना झाले आहे. आज शुक्रवारी आहेर याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याबाबत ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दुजोरा दिला आहे.

ठाणे महापालिकेच्या डेटा एन्ट्री ऑपरेटर महिलेने आहेर याच्याविरोधात 20 एप्रिल 2026 रोजी रात्री दिलेल्या तक्रारीनुसार कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या तक्रारीत 2020 ते 2023 या चार वर्षांच्या कालावधीत आहेर याने पदाचा गैरफायदा घेत तक्रारदार महिलेला हिरानंदानी इस्टेटमधील फ्लॅटवर बोलावून शीतपेयातून गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच वारंवार शारीरिक संबंधांची मागणी केल्याचाही आरोप केला आहे.

गुरुवारी पहाटे आहेर हा कोल्हापूर शहराजवळील नरंदे (ता. हातकणंगले) येथील अन्नपूर्णा हॉटेलमध्ये असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी पहाटे तीन वाजता तेथे छापा टाकत त्याला ताब्यात घेतले.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक कोल्हापूरला रवाना झाले आहे. रात्री उशिरापर्यंत किंवा शुक्रवारी ते पथक ठाण्यात आल्यानंतर शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

  • नाशिकमधील तथाकथित भोंदू अशोक खरात याचे नावही याप्रकरणात समोर आले आहे. त्याने तक्रारदार महिलेला नाशिक येथे नेऊन अघोरी प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आहेर फरार होता. मध्यंतरी आहेरने अटक टाळण्यासाठी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता; मात्र काही तासांतच तो मागे घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT